
मोसंबीची बाग दाखवण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याला निर्जनस्थळी बोलावून त्याला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण करून लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
जालना शहराजवळील मांडवा शिवारात एका व्यापाऱ्याला मोसंबीची बाग दाखवण्याच्या बहाण्याने बोलावण्यात आले होते. तिथे व्यापाऱ्याला आणि त्याच्या मुलाला मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा ऐवज लुटण्यात आला होता. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले होते. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश संतोष परळकर (रा. गांधीचमन, जालना) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. छ्त्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथील एका इसमाकडून ‘सुपारी’ घेऊन हा गुन्हा केल्याचे त्याने मान्य केले.
अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये गणेश संतोष परळकर ( रा. जालना), महेश उर्फ सोनू राजू गोशीक (रा. लक्ष्मीनारायणपुरा, जालना),गणेश बाबूराव मोहिते ( रा. जालना), गणेश भावराव पाखरे (रा. दरेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर),ईलीयास नजीरोद्दीन बागवान (रा. लाडसावंगी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर),कृष्णा दीपक पैंजणे (रा. जालना) या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी जितु मेहरा (रा. मस्तगड,जालना ) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी ईलीयास बागवान आणि जखमी व्यापारी अशफाक बागवान यांच्यात जुना वाद होता. याच वादातून ईलीयासने गणेश पाखरेमार्फत गणेश परळकरच्या टोळीला व्यापाऱ्याला मारहाण करण्याची सुपारी दिली होती. या टोळीने केवळ हीच लूट केली नाही, तर अंबड रोडवरील अशोक हॉटेलसमोर एका दुचाकीस्वाराला अडवून खंजीरने वार करत साडेतीन लाख रुपये लुटल्याची कबुलीही दिली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी आरोपी कृष्णा पैंजणे याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन,दोन खंजीर, मोटारसायकल असा एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, मनसुब वेताळ , प्रशांत देशमुख , कृष्णा तंगे, अभिजीत वायकोस, रवींद्र देशमुख, जोहसिंग कलानी, वाघुंडे, सागर बावस्कर, दत्ता वाघुंडे त्यांच्या पथकाने केली.



























































