अमरावतीत पाच न्यायाधीशांची घरे फोडली, पोलीस बंदोबस्त असूनही भरवस्तीत मध्यरात्री चोरटे घुसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांसह इतर नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच राज्यात न्यायाधीशही सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. अमरावती जिह्यात पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरे चोरटय़ांनी फोडली.  शनिवारी मध्यरात्री कांतानगर भागात न्यायाधीशांच्या वसाहतीत पोलिसांचा खडा पहारा असूनही चोरटय़ांनी एकूण नऊ घरांची कुलपे तोडून चोरी केली. या घटनेने ‘सुरक्षेची ऐशीतैशी’ उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

न्यायाधीशांची निवासस्थाने असलेला कांतानगर भाग अमरावतीतील सुरक्षित भाग मानला जातो. याच सुरक्षित भागात नलदमयंती आणि पैनगंगा अशा दोन वसाहती आहेत. या वसाहतींत घुसलेल्या चोरटय़ांनी थेट न्यायाधीशांच्या निवासस्थानांना टार्गेट केले आणि धाडसी चोरीचा धुमाकूळ घातला. न्यायालयांना शनिवारी-रविवारी सलग सुट्टी होती. त्यामुळे अनेक न्यायाधीश आणि कर्मचारी बाहेरगावी गेले होते. त्याचाच फायदा उठवत चोरटय़ांनी न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील कपाटे फोडून त्यातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व इतर लाखो रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. न्यायाधीशांच्या घराबाहेर पोलिसांचा चोख पहारा होता. असे असताना चोरटय़ांनी वसाहतीत शिरकाव कसा केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर चोरीच्या कटात वसाहतीतील आणखी कोणी मदत केली का, याचा अधिक तपास केला जात आहे.

चोरीचा घटनाक्रम

कांतानगर भागात न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या दोन वसाहती आहेत. त्यापैकी नलदमयंती वसाहतीतील तीन न्यायाधीशांच्या घरी चोरी करण्यात आली. त्यानंतर पैनगंगा इमारतीतील दोन न्यायाधीशांची घरे फोडण्यात आली. न्यायाधीशांच्या घरांमागील वसाहतीतील चार कर्मचाऱ्यांच्या घरांचेही कुलूप तोडण्यात आले. न्यायाधीशांच्या वसाहतीतील या घटनेने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

परिसराची आधीच ‘रेकी’ केल्याचा संशय

सुट्टीत न्यायाधीश बाहेरगावी जातात. याचाच फायदा उठवण्यासाठी चोरटय़ांनी कांतानगर भागाची आधीच ‘रेकी’ केली असावी, असा संशय वर्तवण्यात येत आहे. ज्या घरांना कुलूप लावले होते, तीच घरे चोरटय़ांनी अचूकपणे टार्गेट केली. त्यामुळे हा संशय बळावला आहे. चोरटय़ांनी वसाहतीच्या मागील बाजूने झुडपांचा आधार घेत भिंतीवरून उडी मारून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटय़ांचे पलायन कैद झाले आहे. चोरटय़ांनी नऊ घरांमधून नेमका किती ऐवज चोरून नेला, याची माहिती समोर आलेली नाही.