डोंबिवलीच्या पिंपळेश्वर रस्त्यावर हिरव्या पाण्याचे पाट; प्रदूषणामुळे रहिवाशांचा जीव घुसमटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिरवा पाऊस, ऑईलमिश्रित पाऊस, लाल, गुलाबी, निळ्या रंगांच्या रस्त्यांमुळे डोंबिवली एमआयडीसी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. आता याच एमआयडीसीच्या फेज २ च्या पिंपळेश्वर मंदिराजवळील रस्त्यावर आज सकाळी हिरव्या पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना या रसायनमिश्रित पाण्यातूनच वाट काढत जावे लागत होते. या पाण्याच्या उग्र वासाने नागरिकांचा अक्षरशः जीव घुसमटला आहे.

२१ जानेवारी २०१४ रोजी प्रथम डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला आणि येथील प्रदूषणाचा मुद्दा राज्यभर गाजला. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२० रोजी रस्ता गुलाबी झाला. शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन स्वतः डोंबिवली औद्योगिक क्षेत्राला भेट दिली होती. एमआयडीसीतील कारखान्यांना तंबी देत प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र तरीदेखील वारंवार आगी लागणे, प्रदूषण व अपघाताच्या
घटना घडत आहेत. असाच एक प्रकार एमआयडीसी फेज दोन परिसरातील पिंपळेश्वर मंदिराजवळ उघडकीस आला.

हिरव्या रंगाचे रासायनिक सांडपाणी गटारातून रस्त्यावर वाहत असल्याचे निर्दशनास आले. दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.

उडवाउडवीची उत्तरे

प्रदूषणामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर रासायनिक कारखाने आहेत. काही कारखाने सुरक्षा आणि पर्यावरण निकषांचे पालन करत नाहीत. त्यामुळे या कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या तरी बघतो आणि करतो अशीच उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रत्यक्ष मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.