
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा मैदानावर हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानला 61 धावांनी धूळ चारत सुपर-8 चे तिकीट मिळवले. हा सामना संपल्यानंतर हिंदुस्थानी खेळाडू आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि दोन विकेट्स घेणाऱ्या हार्दिक पंड्याने फिरकीपटू कुलदीप यादवचा मैदानातच क्लास घेतला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून क्रीडाविश्वात याचीच चर्चा सुरू आहे.
पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ईशान किशनच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर हिंदुस्थानने 175 धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 18 षटकांमध्ये 114 धावांमध्ये बाद झाला आणि हिंदुस्थानने दणदणीत विजय मिळवला. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव कुलदीप यादववर चांगलेच संतापले. दोघांनीही भर मैदानात त्याला खडे बोल सुनावले. अखेर रिंकू सिंह याने मध्यस्थी करत दोघांमध्ये समेट घडवून आणली.
Something is going on between Kuldeep Yadav and Suryakumar Yadav + Hardik Pandya.
Kuldeep doesn’t seem happy with them.#INDvsPAK #ICCMensT20WorldCup pic.twitter.com/D4Wu2w28x0— Soumyajit ➐ (@aShameLessSoul) February 15, 2026
सोपा झेल सोडला
हिंदुस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. पाकिस्तानच्या विकेट्स एकामागोमाग एक जात होत्या. हिंदुस्थानला विजय दृष्टीपथात दिसत होता. परंतु पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज शाहीन आफ्रिदी याने प्रत्येक चेंडू फटकावण्याचे ठरवले. त्याने काही आकर्षक फटके मारत चौकार, षटकारही वसूल केला. अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्या शाहीन आफ्रिदीला गोलंदाजी करत होता. हार्दिकने टाकलेल्या शॉर्ट-लेंथ चेंडूवर शाहीनने लेग साइडला पूल शॉट मारला. सीमारेषेवर उभा असलेल्या कुलदीप यादवकडे एक सोपा झेल आला होता, पण त्याच्या हातून तो निसटला आणि चेंडू थेट सीमारेषेबाहेर षटकार गेला.
पंड्या, सूर्याचा संताप
हा झेल सोडल्यानंतर हार्दिक पंड्याने चांगलात आकांडतांडव केला. त्यानंतर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर हार्दिकने तारिकला बाद करत हिंदुस्थानला विजयी केले. मात्र झेल सोडल्याचा राग हार्दिकच्या मनात होता आणि जेव्हा हिंदुस्थानचा संघ विजयाचा जल्लोष करण्यासाठी एकत्र आला, तेव्हा हार्दिक कुलदीपवर उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत होता. यावेळी रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांनी मध्यस्थी करून हार्दिकला शांत करण्याचा प्रयत्न केला.


























































