विवाहापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालयाने केली महत्त्वपूर्ण टिप्पणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एका जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, जर एखादी महिला विवाहाबाबत खरोखरच गंभीर होती, तर तिने लग्नापूर्वी आरोपीसोबत जायला नको होते.

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती नागरत्ना यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान म्हटले की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या की, “कदाचित आमचे विचार जुन्या वळणाचे असू शकतात, परंतु लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी अनोळखी असतात. त्यांच्या नात्यात कितीही चढ-उतार आले तरी, लग्नापूर्वी ते शारीरिक संबंध कसे काय ठेवू शकतात, हे आम्हाला समजू शकत नाही.”

या प्रकरणातील आरोपीने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती नागरत्ना यांनी विवाहापूर्वीच्या संबंधांवर हे निरीक्षण नोंदवले.

संबंधित महिलेने आरोपीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मात्र, दोन्ही बाजूंच्या सहमतीने ठेवण्यात आलेल्या संबंधांच्या संदर्भात न्यायालयाने ही भूमिका मांडली आहे. या टिप्पणीमुळे विवाहाचे आश्वासन आणि शारीरिक संबंध यांमधील कायदेशीर गुंतागुंतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. न्यायालय यावर काय अंतिम निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.