
13 षटकांत अर्धा संघ गमावल्यानंतर फलकावर 107 धावा लागल्या असताना विल जॅक्सच्या 22 चेंडूंतील 53 धावांच्या झंझावाताने इंग्लंडला अनपेक्षितपणे 202 धावांवर पोहोचवले आणि हाच घणाघाती खेळ इंग्लंडसाठी सुपर एटचा जॅकपॉट ठरला. फुटबॉल जगतात इंग्लंडचा वैरी असलेल्या इटलीने 203 धावांचा जबरदस्त पाठलाग केला, पण अनुभवाने कमी असलेल्या या नवोदित संघाचा डाव 178 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि इंग्लंडने ‘क’ गटात वेस्ट इंडीजपाठोपाठ सुपर एटमध्ये नाव नोंदवल्यामुळे उर्वरित इटली, स्कॉटलॅण्ड आणि नेपाळ या संघाचा वर्ल्ड कप प्रवास संपला.
टी 20 विश्वचषकमध्ये अखेर अपेक्षित तोच धडाका पाहायला मिळाला. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर झालेल्या ‘क’ गटाच्या लढतीत इंग्लंडने विल जॅक्सच्या झंझावाती कामगिरीच्या जोरावर इटली क्रिकेट संघाला 24 धावांनी पराभूत करत सुपर एटमध्ये दिमाखात प्रवेश केला. इंग्लंडने फिल सॉल्ट, जेकब बेथेल, टॉम बॅण्टन आणि सॅम करन यांच्या फटकेबाज विशीने संघाला शंभरी गाठून दिली, तर जॅक्सच्या सुसाट खेळाने द्विशतकापार नेले. इंग्लंडच्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पदार्पणवीर इटलीने आपल्या जिद्दीची झलक दाखवली. बेन मॅनेंती आणि ग्रॅण्ट स्टुअर्ट यांच्या 3 षटकांत ठोकलेल्या 40 धावांच्या भागीने इंग्लंडच्या हृदयाचे ठोके चुकवले होते. पण ही जोडी 178 धावांवर फुटताच पुढील 7 चेंडूंत एकही धाव न करता त्यांचे उर्वरित दोन्ही फलंदाजही बाद झाले आणि इंग्लंडने 24 धावांनी विजय मिळवला.
सामन्यावर धावती नजर
जोस बटलर (3) पुन्हा एकदा अपयशी ठरला, पण फिल सॉल्ट (28), जेकब बेथेल (23), टॉम बॅण्टन (30) यांनी वेगवान खेळय़ा करत इंग्लंडला 12 व्या षटकात शंभरी गाठून दिली.
जॅक्स आणि सॅम करन यांनी सहाव्या विकेटसाठी 25 चेंडूंत 54 धावांची भागी रचली.
73 चेंडूंत धावांचे शतक करणाऱया इंग्लंडने 56 चेंडूंत दुसरे शतक ठोकत द्विशतकी मजल मारली.
जॅक्सने इंग्लंडसाठी सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी साकारताना 21 चेंडूंत पन्नाशी साजरी केली. यात 4 षटकार आणि 3 चौकार खेचले.
इटलीला पहिल्याच षटकांत जोफ्रा आर्चरने एका धावेत दोन धक्के दिले. अँथनी मोस्का आणि जेजे स्मट्स हे शून्यावर बाद झाले.
जस्टिन मोस्का (43) आणि बेन मॅनेंती (60) यांनी 8 षटकांत 92 धावांची भागी रचत सामन्यात जान आणली.
मॅनेंतीने 25 चेंडूंत 6 षटकार खेचत इंग्लंडला चांगलेच ठोकले. त्याने 60 धावा केल्या. ग्रॅण्ट स्टुअर्टने 23 चेंडूंत 5 षटकार आणि 2 चौकार खेचत 43 धावा वसूल केल्या. या खेळीने इंग्लंडच्या पोटात गोळा आणला होता. जॅमी ओव्हरटन आणि सॅम करनने 3 विकेट घेत इंग्लंडचा सुपर एट प्रवास सुखकर केला.


























































