
तू समाजासाठी काही चांगले काम केलेले नाही, तुला ‘टाडा’ कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आलेले आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने 1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्पह्टातील दोषी कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. न्यायालयाने सालेम याला उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
अबू सालेम याला पोर्तुगाल येथून प्रत्यार्पण करत नोव्हेंबर 2005मध्ये हिंदुस्थानात आणले होते. त्याला फेब्रुवारी 2015मध्ये विशेष टाडा न्यायालयाने 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र मी तुरुंगात 25 वर्षांपेक्षा सुमारे 10 महिने जास्त घालवले आहेत. त्यामुळे माझी सुटका करण्याची मागणी सालेमने केली होती. मात्र त्याने केवळ 19 वर्षांचीच शिक्षा भोगल्याचे शपथपत्र तुरुंग महानिरीक्षकांनी गेल्या वर्षी सादर केले होते. त्यामुळे न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सालेम याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत कोणताही तात्पुरता दिलासा दिला नाही.




























































