ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात चालकांची ऑनड्युटी दारू पार्टी; शहर अभियंत्यांची गाडी, एसी फुल्ल, चाखना आणि गाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृद्ध वारसा लाभलेल्या ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात नेहमी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांचा राबता असतो. गजबजलेल्या या ठिकाणी सोमवारी शहर अभियंत्यांच्या चालकांनीच कारमध्ये ऑनड्युटी दारूची पार्टी केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गाडीतील एसी फुल्ल.. चाखन्याची पाकिटे आणि गाणी असा मदहोश माहोल पालिका मुख्यालयाच्या आवारात दिसून आला. गाडीमध्ये दारू ढोसत असताना चालकाला रंगेहाथ पकडलेही, पण धुंदीमध्येच व्हीआयपी गेट तोडून त्याने गाडीसह अक्षरशः पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ठाणे पालिकेच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर यांची निवड झाल्याने आता पालिका मुख्यालयात लोकप्रतिनिधी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ वाढली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तसेच महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांची वाहने ज्या व्हीआयपी गेटमधून प्रवेश करतात त्याच गेटसमोर सोमवारी दुपारी शहर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्या गाडीत दारू ढोसण्याचा प्रकार सुरू असल्याचे काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले.

तडकाफडकी निलंबित

मुख्यालयाच्या आवारातच दारू पिणारा चालक सतीश तेटवार आणि विपूल बनकर या खासगी वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. वाहनचालक सतीश तेटवार याला मद्यप्राशन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर विपूल बनकर हा खासगी वाहनचालक असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हा गंभीर प्रकार

पालिकेच्या मुख्यालयासारख्या संवेदनशील आणि उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणी घडलेला हा प्रकार गंभीर आहे. याप्रकरणी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.

  • सतीश तेटवार आणि विपूल बनकर हा खासगी वाहनचालक कारमध्ये बसून दारू पित होता. काही दक्ष नागरिकांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र या वाहनचालकांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
  • या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढत असताना एका वाहनचालकाने गाडीने थेट गेट तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या फिल्मी स्टाईल घटनेमुळे विविध कामांसाठी मुख्यालयात आलेल्या नागरिकांचीही भीतीने गाळण उडाली.
  • आयुक्त व महापौर यांच्या अधिकृत वाहनांच्या पार्किंग परिसरात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या मद्यपींवर कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.