
हिंदुस्थानी सागरी हद्दीत बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेने निर्बंध घातलेली आणि इराणशी संबंध असलेली तीन तेलवाहू जहाजे जप्त करण्यात आली आहेत. ‘इंडिया टूडे‘ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या जहाजांची नावे ‘स्टेलर रुबी’, ‘अस्फाल्ट स्टार’ आणि ‘अल जाफझिया’ अशी आहेत. ही जहाजे मुंबईपासून साधारण 100 नॉटिकल मैल पश्चिमेला संशयास्पद हालचाली करताना आढळली होती. त्यानंतर हिंदुस्थानी तटरक्षक दलाने त्यांना ताब्यात घेऊन अधिक तपासासाठी मुंबई बंदरात आणले आहे.
समुद्री वाहतुकीवर हिंदुस्थानची करडी नजर असून इराणच्या जहाजांनी आपली ओळख लपवण्यासाठी वारंवार नावे बदलल्याचे तपासात समोर आले आहे. ही जहाजे ‘शिप-टू-शिप’ तेल हस्तांतरण करून तेलाचा मूळ उगम लपवण्याचा प्रयत्न करत होती. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमधून वाचण्यासाठी अशा प्रकारे मध्य समुद्रात तेलाची अदलाबदल केली जाते. हिंदुस्थानच्या सागरी क्षेत्राचा वापर अशा बेकायदेशीर कामांसाठी होऊ नये, यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, इराणच्या ‘नॅशनल इराणी ऑईल कंपनी’ने या जहाजांशी असलेला कोणताही संबंध फेटाळून लावला आहे. ही जहाजे किंवा त्यावरील माल आमचा नाही, असा दावा इराणी प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र, ‘एलएसईजी’ कडील आकडेवारीनुसार, यातील ‘अल जाफझिया’ने 2025 मध्ये इराणमधून जिबूतीला इंधन वाहून नेले होते, तर ‘स्टेलर रुबी’वर इराणचा ध्वज होता.

























































