
जगातील टेक्नोलॉजीचा महाकुंभ म्हणून ओळखला जाणारा ‘भारत एआय इम्पॅक्ट समिट 2026’ ला आज दिल्लीतील भारत मंडपमध्ये सुरूवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी जगभरातून दिग्गज लोक उपस्थित राहणार आहे. मात्र मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी या समिटला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. गेट्स फाउंडेशनच्या ‘X’ वरील अधिकृत अकाऊंटने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. बिल गेट्स या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून त्यांचे नियोजित भाषण देतील, असे त्यात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जेफ्री एपस्टीन प्रकरणात समोर आलेल्या नवीन कागदपत्रांमुळे गेट्स यांच्यावर सोशल मीडियावरून कडाडून टीका होत होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीतील नियोजित कार्यक्रमातून माघार घेतल्याचे बोलले जात होते. त्यामुळे समिटच्या ऑनलाइन वक्तांच्या यादीत गेट्स यांचे नाव न दिसल्याने ते या कार्यक्रमाला येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता फाउंडेशनने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. गेट्स फाउंडेशनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी एआय क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले आहे.
Bill Gates is attending the AI Impact Summit. He will be delivering his keynote as scheduled.
India is a global leader in artificial intelligence, powered by one of the world’s largest AI talent pools, rapid adoption across sectors, and innovation at population scale. Under the… pic.twitter.com/e3v8wXHBXA
— Gates Foundation India (@BMGFIndia) February 17, 2026
सध्या बिल गेट्स हिंदुस्थान दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली. तेथे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि मंत्री नारा लोकेश यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान आरोग्य, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात ‘गेट्स फाऊंडेशन’च्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांवर चर्चा झाली.
हिंदुस्थान दौऱ्यावर असलेल्या बिल गेट्स यांना विरोध होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडिया युझर्सनी एपस्टीन प्रकरणाचा संदर्भ देत गेट्स यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित कागदपत्रांचा नवीन माहिती सार्वजनिक केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. मात्र, बिल गेट्स यांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, त्यांच्या एक्स पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनीही एपस्टीनसोबतच्या भेटी हे त्यांच्या घटस्फोटाचे एक कारण असल्याचे संकेत दिले आहेत.

























































