Ajit Pawar Plane Crash – कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला आगीची झळ! डेटा मिळवण्यासाठी अमेरिकन कंपनीची मदत घेणार, AAIBने दिली मोठी माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेबाबत तपास सुरू झाला असून विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी तो दिल्लीला नेण्यात आला होता. याबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे. अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगण्यात आले. आता या ब्लॅक बॉक्समधील दोन्ही रेकॉर्डरवरती उच्च तापमानाचा, आगीचा दुष्परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातासंदर्भात पहिल्यांदाच अधिकृत माहिती देण्यात आली असून तपास ब्युरोकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. यामध्ये एक डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश आहे. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर बराच वेळ उच्च तापमानात असल्यामुळे आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यापैकी एका (DFDR) रेकॉर्डरचा डेटा यशस्वीरित्या डाउनलोड केल्याचे AAIB कडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील डेटा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉकपिट रेकॉर्डरची निर्मिती हनीवेल कंपनीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी कॉकपिट ऑडिओ डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवणार असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे.

अजितदादांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि इतर नेत्यांनी या अपघातावर शंका उपस्थित केल्या आहेत. रोहित पवार रोज नवनवीन माहिती माध्यमासमोर आणत आहेत. त्यामुळे आता रिकव्हर झालेल्या या डेटामधून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणे गरजेचे आहे.

अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवणार, सूत्रांची माहिती