कूनो राष्ट्रीय उद्यानात आनंदाची बातमी, मादी चित्ता ‘गामिनी’ने दिला तीन शावकांना जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यानातून वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत सुखद बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून हिंदुस्थानात आणलेल्या ‘गामिनी’ नावाच्या मादी चित्त्याने तीन गोंडस शावकांना जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे कूनो उद्यानात उत्साहाचे वातावरण आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली असून त्यांनी नवजात पिलांचा एक मोहक फोटो देखील शेअर केला आहे.

गामिनीने दुसऱ्यांदा आई होण्याचा मान मिळवला असून, तिच्या या यशस्वी प्रसूतीबद्दल केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पशुवैद्यकीय पथकाचे विशेष कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकेतून चित्त्यांच्या आगमनाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच ही बातमी आल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गामिनीने दिलेल्या या जन्मामुळे हिंदुस्थानच्या भूमीवर चित्त्यांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प अधिक भक्कम होताना दिसत आहे.

या तीन नवीन शावकांच्या आगमनानंतर हिंदुस्थानात जन्मलेल्या शावकांची संख्या आता 27 वर पोहोचली आहे. तसेच, कूनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची एकूण संख्या आता 38 झाली आहे.