ओरडल्याच्या रागातून भाच्यानेच काढला आत्येचा काटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आत्या ओरडल्याच्या रागातून अल्पवयीन भाच्याने मित्राच्या सहाय्याने आत्येचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना वसईच्या बहामपूर गावात घडली. दुर्गा बनसोडे असे मृत महिलेचे नाव असून ती एकटीच राहत होती. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

वसई पश्चिमेतील बामपूर गावातील भिमाई बंगल्यात दुर्गा बनसोडे राहत होत्या. सोमवारी सकाळी बंगल्यात त्यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यावेळी दुर्गा यांचा १५ वर्षांचा भाचा अधूनमधून त्यांना भेटायला येत असल्याचे तपासात उघड झाले. नेहमीप्रमाणे भाचा आत्येला भेटायला आला. मात्र क्षुल्लक कारणावरून आत्या त्याला ओरडली. याचा राग आल्याने त्याने आपल्या मित्राला बोलावून घेतले. आत्या बेसावध असताना भाच्याने दुर्गा यांच्या डोक्यावर बांबूचा घाव घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.