
बनावट लेबल लावून परराज्यातील दारू मोखाड्यात विक्री करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी मोखाड्यातील एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईत तब्बल १७लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परराज्यातील दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या डहाणू विभाग व भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे अरुण चव्हाण यांनी पथकासह सापळा रचला. महिंद्रा पिकअप वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये परराज्यात विक्रीस आणलेल्या विदेशी दारूचे ७० बॉक्स आढळून आले. हा साठा जागीच जप्त करून वाहनचालक भोरू बिन्नर याला ताब्यात घेण्यात आले. मोखाडा-खोडाळा मार्गावरील देवबांध शिवारात, गणपती मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली.
घरात छापा टाकण्यात आला
मोखाड्यातील खोडाळा येथे एका घराच्या गच्चीवर छापा टाकण्यात आला. तेथे परराज्यातील मद्याच्या बाटल्यांवर महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी असे छापलेले बनावट लेबल लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या चौकशीत आणखी एक आरोपी असून सध्या तो फरार आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाळे उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान
परराज्यातील मद्याचा मोठा साठा आढळून आल्याने तालुक्यात अन्य ठिकाणीही अशा प्रकारे अवैध दारू विक्री सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणे, अवैध दारू विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान मोखाडा पोलिसांसमोर आहे.




























































