
>> वैश्विक, [email protected]
खरं तर ‘क्लाऊड नाइन’ हा शब्दप्रयोग एखादी व्यक्ती अत्यानंदात आहे असं सांगणारा असतो. परंतु आजकाल सूर्याच्या तेजस्वी ‘करोना’चं नावसुद्धा भयावह व्हायरसला देण्यात आल्याचं जगाने अनुभवलंय. वास्तविक सूर्याचं केवळ खग्रास सूर्यग्रहण काळात नुसत्या डोळय़ांनी पाहता येणारं प्रभामंडळ म्हणजे ‘करोना.’ पण हा शब्द त्या रोगाने बदनाम केला. तसंच काहीसं ‘क्लाऊड नाइन’ या आनंदाच्या संकल्पनेचं झालंय.
अवकाशातल्या एका पोकळ किंवा ताऱ्यांची निर्मिती होत नसलेल्या दीर्घिकेला ‘क्लाऊड-9’ असं नाव देऊन काय साधलं? पण दिलंय खरं. यापुढे कोणी ‘मी अगदी ‘क्लाऊड- नाइन’वर आहे असं म्हटलं तर खगोलीय विश्वात ती व्यक्ती एका ‘नापास’ दीर्घिकेवर आहे असं म्हणावं लागेल. अर्थात वैज्ञानिक नावं आणि व्यावहारिक अर्थाचा मेळ बसत नसतो. नाहीतर चंद्राची उपमा सौंदर्याला दिली गेली नसती नि शुक्राला ‘तारा’ समजलं गेलं नसतं आणि ‘तारा पडण्या’ची चुकीची कल्पना सिनेमांमध्ये रुजली नसती.
ते जाऊ द्या. मूळ विषय एका अयशस्वी ‘नापास’ दीर्घिकेचा. आपली जुनापुराणी अवकाशी ‘हबल’ आणि नैऋत्य (दक्षिण पश्चिम) चीनमधल्या पिंगटॅला प्रांतातील डावोडान्ग येथे उभारलेल्या ‘फास्ट’ रेडिओ टेलिस्कोपने या ‘क्लाऊड-9’च्या ‘नापास’पणावर शिक्कामोर्तब केलंय. ‘फाइव्ह हन्ड्रेड मीटर स्फेरिकल टेलिस्कोप’ ही चीनची महत्त्वाकांक्षी पॅरॅबोलिक’ (अन्वस्त) रेडिओ दुर्बीण असून ती 2016 पासून कार्यान्वित झालेली आहे.
यापूर्वी अशी जमिनीवरची महाकाय रेडिओ दुर्बीण अमेरिकेतील पर्टोरिको येथे होती. तिचं नाव ‘ऑरिसिबो.’ आपल्याकडे उत्साही खगोल अभ्यासक तिथे भेट देत असत. खगोल मंडळाचे पूर्व सचिव, सतीश डोईपह्डे यांनी ‘ऑरिसिबो’ला भेट देऊन ‘खगोल मंडळा’च्या खगोल-वार्तामध्ये त्याचं सविस्तर वर्णन दिलं होतं. मात्र 2017 च्या महावादळात ही दुर्बीण निकामी झाली. त्याच सुमारास चीनची ‘फास्ट’ कार्यान्वित झाली होती.
‘फास्ट’ची रचना धातूच्या 4500 पॅनलची जुळणी करून झाली असून तिचं रेडिओ लहरी ग्रहणक्षेत्र 21 लाख 10 हजार चौरस फूट आहे. 10 सेंटीमीटर ते 3 मीटर तरंगलांबीचे ग्रहण करून त्याचं विश्लेषण तिथे केलं जातं. याच अभ्यासात फास्टला आणि हबल अवकाशी दुर्बिणीसाठी एम-94 या सर्पिलापृती (स्पायरल) म्हणजे आपल्या आकाशगंगेसारख्याच आकाराच्या दीर्घिकेभोवती फिरणारी एक दीर्घिका आढळली. तिचंच नाव क्लाऊड-9.
‘हबल’ने लावलेले अनेक अवकाशी शोध आणि त्यावरच्या पॅमेऱ्याने पाठवलेले हजारो पह्टो आपल्या विश्वाचा उलगडा सातत्याने करतायत. त्याला आता ‘जेम्स वेब’ या इन्फ्रारेड पिंवा अवरक्त किरणांच्या दुर्बिणीची साथ मिळत असल्याने विश्वनिर्मितीच्या प्रारंभीच्या काळात कोणत्या घडामोडी घडत होत्या, याचा भूतकाळात जाऊन धांडोळा घेता येतोय.
फास्ट रेडिओ दुर्बिणीचं कार्य अनेक प्रकारे सुरू असून आंतरतारकीय द्रव्यातील संयुगांचा अभ्यास (इन्टरस्टेलर मॅटर- मॉलेक्युल) त्यातला एक भाग आहे. याशिवाय पल्सार पिंवा पल्सेरिंग स्टार आणि विश्वातील हायड्रोजचं स्वरूप जाणून घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. 2016 मध्ये ‘सेटी’ पिंवा ‘सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्टिअल इंटेलिजन्स या प्रकल्पाच्या सहयोगाने परताऱ्यांच्या ग्रहांकडून (येत असलेला) संदेश ग्रहण करण्याचाही प्रयत्न झाला.
असा एक पृथ्वीवरचा, तुलनेने नवा आणि अवकाशातील ‘तिसरा डोळा’ ठरलेला जुन्या अशा दोन रेडिओ दुर्बिणींना एम-94 मधली ही ‘नापास दीर्घिका’ दिसली आणि संशोधकांना आश्चर्य वाटलं. कारण आपल्या आकाशगंगेसारख्या दीर्घिकांमध्ये 100 ते 200 अब्ज तारे असतात. या ‘क्लाऊड-9’ने मात्र तशी आनंदवार्ता संशोधकांना दिली नाही. तारेनिर्मितीत ती नापास ठरली.
ही दीर्घिका आपल्यापासून 14 ते 16 दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावर आहे. या दीर्घिकेत आपल्या सूर्याच्या 5 अब्ज पट पृष्णद्रव्य (डार्प मॅटर) आहे. तारे बनवणारा हायड्रोन आहे. परंतु सर्व पदार्थ भरपूर असूनही पदार्थ बनवण्याची एक वैश्विक रेसिपी तयारच झालेली नाही. सर्व साहित्य असूनही ताऱ्यांचा मागमूसही या क्लाऊड-9 मध्ये नाही. या दृष्टीने ती ‘फेल्ड गॅलॅक्सी’ पिंवा नापास- दीर्घिका ठरली आहे.
असं का व्हावं? या सर्व मूलभूत आणि आवश्यक गोष्टी अस्तित्वात असल्या तरी, म्हणजे गॅस, ग्रॅव्हिटी, डार्प मॅटर असूनही तारे बनण्याची ‘क्रिटिकल’ (अत्यावश्यक) प्रक्रिया सुरू न झाल्याने तिथे तारेनिर्मिती झालेली नाही. ज्या एम-94 तारकासमूहाचा ‘क्लाऊड-9’ हा भाग आहे ती दीर्घिका द्विवर्तुळीय असून या केनेस वेनॅरिसी (अरंधती) तारकासमूहात (हन्टिंग डॉग) प्रसिद्ध ‘व्हर्लपूल’ ‘सनफ्लावर’ अशाही दीर्घिका आहेत. त्यांच्यात अब्जावधी तारे आहेत.
त्यातल्या ‘क्लाऊड-9’ला हे यश नाही लाभलं हेच आता या दीर्घिकेचं वैशिष्टय़ ठरतंय. आपल्याला मात्र विश्वाचा सतत शोध घेणाऱ्या दुर्बिणीद्वारा घरबसल्या ही सारी माहिती मिळतेय आणि विश्व अजून बरंच अगम्य आहे याची प्रचीतीसुद्धा!


























































