लोकमान्य टिळक रुग्णालय कर्मचारी रहिवाशांना शीव-कोळीवाडा परिसरातच सेवा निवासस्थान द्या! शिवसेनेची अधिष्ठात्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकमान्य टिळक रुग्णालय वसाहतीतील कर्मचारी रहिवाशांची घरे इमारत दुरुस्तीच्या नावाखाली खाली करण्यात येणार असून त्यांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात येणार आहे. तशी नोटीसही त्यांना बजावण्यात येणार असल्याने या रहिवाशांना शीव-कोळीवाडा परिसरातच सेवा निवासस्थान देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

लोकमान्य टिळक रुग्णालयांतर्गत येणाऱया शीव-कोळीवाडा कामगार वसाहतीतील कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत आहेत. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली येथील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. कर्मचारी रहिवाशांच्या मुलांची शाळा याच परिसरात असल्याने त्यांची आबाळ होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात घेता कर्मचारी वर्गाला याच परिसरात सेवा निवासस्थान देऊन सहकार्य करावे, अशी मागणी विधानसभा संघटक गजानन पाटील यांनी लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विधानसभा संघटक गजानन पाटील, शाखाप्रमुख प्रशांत जाधव, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना सायन युनिटचे संघटक सुजित धुमाळ, अध्यक्ष जनार्दन वरक, सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष संतोष खरे तसेच संजय बेनवाल, बाबू लक्ष्मण श्रीराम, विलास कदम पुजारी आदी उपस्थित होते.