लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणारा तो बुरखाधारी मनोरुग्ण; कुर्ला पोलिसांनी सलग 10 दिवस शोध घेऊन पकडले, नाशिकमधील घरात सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुरखा परिधान करून लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करताना रंगेहाथ पकडला गेलेला, नंतर परागंदा झालेला तो पुरुष अखेर सापडला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी सलग 10 दिवस शोधमोहीम राबवून त्याला पकडले. नाशिकच्या घरात तो मिळून आला. बुट आणि तीन पिशव्यांच्या आधारे ओळख पटवून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

7 फेब्रुवारीला घाटकोपर स्थानकात अप फास्ट लोकलच्या महिलांच्या डब्यात एक पुरुष बुरखा घालून घुसल्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर वायरल झाला होता. महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने याची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेतली. उपायुक्त प्रज्ञा जेडगे, वरिष्ठ निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोसावी तसेच जगताप, गायकवाड या पथकाने त्या बुरखाधारी पुरुषाचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत पोलीस नाशिकपर्यंत जाऊन धडकले. मग मानवी कौशल्याच्या आधारे माहिती घेतली असता ती व्यक्ती नाशिकच्या मुक्तीधाम परिसरातील पॅराडाईज इमारतीजवळ दिसली. चालण्याची लकब, त्याच्या पायातले बुट आणि हातातल्या तीन पिशव्या यावरून ही व्यक्ती म्हणजे तो बुरखाधारी पुरुष असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. परंतु तो विचित्र उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे विचारणा केल्यावर त्या व्यक्तीचे नाव शेख अल्ताफ हुसैन इस्काह (57) असे असून तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले. संभाजी नगरातील मनोरुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो असाच घरातून निघून जातो, कधीही येतो, नाहीच तर दोन-तीन दिवस घरात स्वतःला कोंडून घेतो, असे त्याच्या घरच्यांकडून सांगण्यात आले.

चोर बाईलवेडा नाही, तर…
तो व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. परंतु त्याबाबत कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नव्हते. बुरखा घालून महिला डब्यात घुसलेला तो चोर, बाईलवेडा असावा असा पुर्ला रेल्वे पोलिसांना संशय होता. पण प्रत्यक्षात तो मनोरुग्ण निघाला.

सुशिक्षित, परदेशात नोकरी
शेख हा वाणिज्य शाखेचा पदवीधर असून आयटीचा डिप्लोमा केला आहे. वर्ष 2006 ते 2021 या दरम्यान तो परदेशात नोकरीला होता. परंतु नंतर तो मनोरुग्णासारखा करू लागल्याने तेथे त्यांच्यावर तीन महिने उपचार करण्यात आले. परंतु त्याच्यात काहीच सुधारणा होत नसल्याने त्याला वर्ष 2022 मध्ये माघारी भारतात पाठविण्यात आले. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.