
”एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण आहे. आम्ही हे भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी उकरून काढलेलं आहे. कुणीही यावं आणि दिल्लीच्या मदतीनं बाळासाहेबांच्या विचारांवर थुंकावं हे आम्हाला चालणार नाही”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर जोरदार निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे याबाबत पत्रकारांनी विचारताच संजय राऊत म्हणाले की, ”एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. अमित शहा व नरेंद्र मोदी यांचा स्वार्थासाठी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. त्यांच्याशी आमचं भांडण महाराष्ट्र हितासाठी आहे. जे नंदनवन तुम्ही सांगताय ना ते त्यांनी शिवसेनेच्या व धनुष्यबाणाच्या चोरीतून उभारलेलं नंदनवन आहे, कुणीही यावं आणि दिल्लीच्या मदतीनं बाळासाहेबांच्या विचारांवर थुंकावं हे आम्हाला चालणार नाही”, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.


























































