शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला… किल्ले शिवनेरीवर रंगला शिवजन्माचा सोहळा, उत्साहाला उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला… दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला… या शब्दांची तंतोतंत प्रचीती देणारा भव्यदिव्य शिवजन्मोत्सव सोहळा आज किल्ले शिवनेरीवर पार पडला. निमित्त होते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे. या तेजोमयी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी किल्ल्यावर गर्दी केली होती. उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.

शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थळी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग आकर्षक पद्धतीने सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व आई जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली.

पुण्यात स्वराज्यरथ सोहळा
पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीने आज शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन केले होते. लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व शिवज्योत प्रज्वलित करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत 96 स्वराज्यरथ आपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले. प्रत्येक रथावर त्या त्या घराण्याचा आणि व्यक्तिमत्त्वांचा गौरवशाली इतिहास साकारण्यात आला होता.

400 वी जयंती जागतिक स्तरावर साजरी होणार – फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी स्व. पंकज वामन (मरणोत्तर पुरस्कार), खारघर येथील टाटा पॅन्सर रुग्णालयाचे विभागप्रमुख डॉ. विनोद सीताराम हांडे, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे आणि उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे यांना ‘शिवनेर भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी 2030 साली महाराजांची 400 वी जयंती जागतिक स्तरावर साजरी केली जाईल’, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.