
वेस्ट इंडीजने ‘क’ गटातील अखेरच्या साखळी लढतीत इटलीचा 42 धावांनी धुव्वा उडवून टी-20 वर्ल्ड कपमध्ये नॉनस्टॉप विजयाचा चौकार ठोकला. 75 धावांची मॅचविनिंग खेळी करणारा शाय होप या सामन्याचा मानकरी ठरला.
विंडीजकडून मिळालेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इटलीचा डाव 18 षटकांत 123 धावांवरच गडगडला. इटलीकडून बेन मॅनेंटी (26), जेजे स्मट्स (24), अँथनी मोस्का (19) आणि ग्रॅण्ट स्टुअर्ट (12) यांनी काहीशी झुंज दिली, मात्र उर्वरित सात फलंदाजांना धावांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वेस्ट इंडीजकडून शमार जोसेफने 4 बळी घेत इटलीचा कणा मोडला. त्याला मॅथ्यू पर्ह्ड (3 विकेट) आणि गुडाकेश मोटी (2 विकेट) यांची साथ लाभली, तर अकील होसेनने 1 विकेट टिपला.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 6 बाद 165 धावसंख्या उभारली. फलंदाजीत शाय होपने 46 चेंडूंमध्ये 6 चौकार व 4 षटकारांसह 75 धावांची दमदार खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याचबरोबर रोस्टन चेस (24) आणि शेरफेन रदरपर्ह्ड (नाबाद 24) यांनीही उपयुक्त योगदान दिले. इटलीकडून क्रिशन कलुगमागे आणि बेन मॅनेंटी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले, तर अली हसन आणि थॉमस ड्राका यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

























































