Ranji Trophy 2025-26 – कर्नाटक अंतिम फेरीत, आता जम्मू-कश्मीरशी गाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजीच्या रनभूमीवर कर्नाटकने पुन्हा एकदा आपली परंपरा जिवंत ठेवली. उत्तराखंडविरुद्धचा उपांत्य सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातील 503 धावांच्या प्रचंड आघाडीच्या जोरावर कर्नाटकने तब्बल 11 वर्षांनंतर रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. 24 फेब्रुवारीपासून हुबळी येथे रंगणाऱया अंतिम लढतीत त्यांचा सामना जम्मू-कश्मीरशी होणार आहे.

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी 6 बाद 299 धावांवरून पुढे खेळताना कर्नाटकचा डाव 323 धावांवर आटोपला. मात्र पहिल्या डावातील भक्कम कामगिरीमुळे त्यांना तब्बल 826 धावांची एकूण आघाडी मिळाली आणि हीच आघाडी त्यांच्या अंतिम फेरीच्या तिकिटाची खात्री ठरली.

उत्तराखंडने दुसऱया डावात अवनीश सुधा (66), सचिन रावत (नाबाद 53) आणि अभय नेगी (नाबाद 57) यांच्या अर्धशतकांमुळे कर्नाटकच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरले. संघाने 6 बाद 260 धावांवर दुसरा डाव घोषित केला. एका टप्प्यावर उत्तराखंडची अवस्था 6 बाद 156 अशी बिकट होती; मात्र नेगी आणि रावत यांनी सातव्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करत सामना रंगतदार केला. अखेरीस चहापानानंतर दोन्ही कर्णधारांनी सामन्यातील निकाल ड्रॉवर शिक्कामोर्तब केला. पहिल्या डावातील आघाडीमुळे कर्नाटकचा मार्ग मोकळा झाला आणि 2014-15 हंगामानंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी त्यांनी साधली. त्यावेळी आर. विनय कुमार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विजेतेपद पटकावले होते. आता त्यांच्या नजरा नवव्या रणजी किताबावर खिळल्या आहेत. दुसरीकडे, सहा दशकांनंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या जम्मू-कश्मीरसमोर इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे.