उमटे धरणातून एक दिवसाआड पुरवठा, 60 हजार अलिबागकरांना पाणीटंचाईचे चटके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालल्याने या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांना एक दिवसाआड पाणी सोडले जात आहे. याचा फटका 12 ग्रामपंचायत हद्दीतील 80 गावपाड्यांना बसला आहे. त्यामुळे तब्बल 60 हजार अलिबागकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार असून धरणातून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. धरणाच्या पाण्यावर 47गावे व 33 आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. धरण बांधून 47 वर्षे झाली असून धरणातील गाळ काढला गेला नसल्याने पाण्याची साठवण 12 ग्रामपंचायतीमधील 80 गावपाड्यांवर पाणीबाणी क्षमता कमी होऊ लगली आहे. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील 80 गाववाड्यांमधील सुमारे 60 हजाराहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. यामुळे धरणातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

उमटे धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पावसाळा येईपर्यंत पाणी पुरवणे आवश्यक आहे. यासाठी 15 फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणात किती दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे याची पाहणी एक-दोन दिवसात केली जाणार आहे. धरणातील गाळ काढून पाहणी केली जाणार आहे.
निहाल चवरकर, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, अलिबाग

गढूळ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

45 वर्षे जुन्या असलेल्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. धरणातील गाळ काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. सध्या धरणातील पाणीसाठा घटला असल्याने धरणातून पुरविण्यात येणारे पाणी हे गढूळ असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करूनही तो सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.