
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ट्रान्स यमुना परिसरातून हुंडाबळीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका विवाहितेने आपल्या सासरच्या मंडळींवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिला केवळ मारहाणच केली गेली नाही, तर तिच्या प्रायव्हसिचा भंग करत तिच्या बेडरूम आणि किचनमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावून तिच्यावर सतत पाळत ठेवली जात होती. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च, 2019 मध्ये पीडितेचे लग्न कपिल देव या व्यक्तीसोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नाच्या वेळी मुलीच्या कुटुंबीयांनी 15 लाख रुपयांहून अधिक खर्च केला होता, ज्यात सोन्या-चांदीचे दागिने, फर्निचर, 5.51 लाख रुपये रोख आणि एक बुलेट यांचा समावेश होता. मात्र, एवढे देऊनही सासरच्यांचे समाधान झाले नाही. लग्नानंतर काही दिवसातच पती आणि सासरच्यांनी महागडी कार आणि 2 लाख रुपये रोख रकमेची मागणी सुरू केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला, जो दोन मुलांच्या जन्मानंतरही थांबला नाही.
एवढ्यावरच पीडितेच्या सासरची मंडळी थांबली नाही तर त्यांनी पीडितेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या दिराने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांचे अँगल अशा प्रकारे सेट केले होते की, पीडितेच्या बेडरूम आणि किचनमधील प्रत्येक हालचाल रेकॉर्ड होत होती. पीडितेने जेव्हा याला विरोध केला आणि कॅमेरे काढण्याची विनंती केली, तेव्हा तिला अधिक त्रास देण्यात आला.
पीडितेच्या तक्रारीनुसार, 5 नोव्हेंबर 2025 रोजी पती, सासरचे लोक आणि दिराने मिळून तिला बेदम मारहाण केली आणि हुंडा न आणल्यास घरातून काढून टाकण्याची धमकी दिली. अखेर 12 डिसेंबर 2025 रोजी तिला तिच्या दोन लहान मुलांसह घराबाहेर काढण्यात आले. त्यावेळी तिच्या दोन महिन्यांच्या बाळाची प्रकृती चिंताजनक असतानाही सासरच्यांनी उपचारासाठी मदत केली नाही. सध्या पीडितेचे सर्व दागिने आणि स्त्रीधन सासरच्यांच्या ताब्यात असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे.



























































