ठसा – आनंद सागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत काही कुटुंबांचा वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीत जात राहिला यात तसं आश्चर्यकारक काही नाही. कपूर, आनंद, खन्ना, चोप्रा, खान, सागर अशी अनेक कुटुंबे आहेत. रामानंद सागर यांच्या कुटुंबाबद्दल तसेच घडले. रामानंद सागर हे पन्नासच्या दशकापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत. राज कपूर दिग्दर्शित ‘बरसात’ (1949) या चित्रपटाची पटकथा त्यांनीच लिहिली आहे. त्यानंतर त्यांनी ‘मेहमान’पासून (1952) चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आणि कालांतराने स्वतःची सागर आर्टस् ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. अंधेरीतील नटराज स्टुडिओच्या पाच निर्माते मालकांपैकी ते एक आणि तेथेच त्यांचे कार्यालय असे असताना त्यांच्या मुलांनाही याच चित्रपटसृष्टीत कार्यरत असणे अगदी स्वाभाविक. रामानंद सागर यांना एक मुलगी सरिता आणि चार मुले. आनंद, सुभाष, प्रेम आणि मोती. यातील दिग्दर्शक आनंद सागर यांचे 13 फेब्रुवारी रोजी वयाच्या 84 वर्षी दुःखद निधन झाले.  आनंद सागर यांचा जन्म 3 मे 1943 रोजी लाहोर येथे झाला. फाळणीनंतर सागर कुटुंबीय हिंदुस्थानात आले. आनंद सागर यांनी मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. आपल्या पित्याच्या दिग्दर्शनातील ‘आरजू’ चित्रपटाच्या वेळी ते सेटवर क्लॅपर बॉय होते.

आनंद सागर यांनी आपल्या आपल्या पित्याच्या दिग्दर्शनातील ‘आँखें’ (1968) या चित्रपटापासून  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. त्याच वेळी त्यांनी पुणे येथील दूरदर्शन आणि चित्रपट अभिनय संस्थेत चित्रपट माध्यम अभ्यासक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर आपल्या पित्याच्याच दिग्दर्शनातील ‘गीत’ (1970), ‘ललकार’ ( 1972), ‘जलते बदन’ ( 1973) या चित्रपटांसाठी एकेक पायरी वर चढत चढत प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वाटचाल केली, त्याचबरोबर त्यांनी सागर आर्टस्च्या या चित्रपटांसाठी मुख्य कार्यकारी निर्माता म्हणूनही काम पाहिले आणि मग आपल्याच कुटुंबाच्या सागर आर्टस् या बॅनरखाली  ‘हमराही’ (1974) या चित्रपटाचे दिग्दर्शक बनून स्वतंत्रपणे काम सुरू केले. आनंद सागर यांच्या अन्य भावंडांनीही एकेक करत सागर आर्टस् या बॅनरखाली विविध प्रकारचे काम सुरू केले. आनंद सागर दिग्दर्शित  ‘हमराही’ या मसालेदार मनोरंजक चित्रपटात तनुजा, रणधीर कपूर, सुजित कुमार, गजानन जहागीरदार, केश्तो मुखर्जी, मा. भगवानदादा, टुणटुण, ललिता पवार या कलाकारांच्या भूमिका आहेत. मुंबईतील रॉक्सी चित्रपटगृहात या चित्रपटाने शंभर दिवसांचे यश संपादन केले. आनंद सागर यांनी त्यानंतर ‘राम भरोसे’, ‘अरमान’, ‘प्यारा दुश्मन’, ‘बादल’ इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात सागर आर्टस् निर्मित  ‘रामायण’ या मालिकेने देशभरात प्रचंड लोकप्रियता संपादन केली. सर्व सागर कुटुंबीयांनी या मालिकेच्या निर्मितीत सहभाग घेतला. उंबरगाव येथे बरेच चित्रीकरण केले. कालांतराने 2008 साली सागर आर्टस्ने ‘रामायण’ मालिका पुन्हा निर्माण केली तेव्हा त्याचे दिग्दर्शन आनंद सागर यांनी केले आणि बडोदा शहरापासून जवळच त्यासाठी भला मोठा सेट लावला. चित्रपटसृष्टी असो वा प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असोत, सगळ्यांशीच अदबीने वागणे, सहकार्य करणे हे सागर कुटुंबीयांचे खास वैशिष्टय़. ही रामानंद सागर यांची शिकवण. आनंद सागर यांनीही आपल्या पित्याप्रमाणेच चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय अशी कामगिरी केली.