
दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटीमध्ये रोबोडॉगवरून प्रचंड वाद निर्माण झाल्यानंतर आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समिटमध्ये शिरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी केली. हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापार कराराला कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. कार्यकर्त्यांनी टी-शर्ट काढून ‘पीएम इज कॉम्प्रमाईज्ड’ अशा घोषणा दिल्या.
एआय समिट सुरू असलेल्या भारत मंडपम येथे आज दुपारी युवक काँग्रेसचे सुमारे 15 ते 20 कार्यकर्ते पांढरे टी-शर्ट घालून आत गेले. त्यांनी अचानक एका ठिकाणी गोळा होत टी-शर्ट काढून हातात धरले आणि पंतप्रधान मोदींविरोधात नारेबाजी केली. त्यांच्या टी-शर्टवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे असून त्यावर ‘पीएम इज कॉम्प्रमाईज्ड’ असे लिहिले होते. या घटनेचा व्हिडीओ युवक काँग्रेसने ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात लिहिले आहे की, एआय समिटच्या चमकदार व्यासपीठामागे सत्य लपवता येणार नाही. जेव्हा देशहितापेक्षा कार्पोरेट हित दिसते आणि परराष्ट्र धोरणात मवाळपणा दिसतो, त्यावेळी विरोध करणे कर्तव्य बनते.
दिल्ली पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. युवक काँग्रेसचे सरचिटणीस कृष्ण हरी, बिहारचे सरचिटणीस कुंदन यादव, उत्तर प्रदेशचे प्रदेश उपाध्यक्ष अजय कुमार आणि राष्ट्रीय समन्वयक नरसिंह यादव अशी त्यांची नावे आहेत.
कार्यकर्त्यांनी असा मिळवला प्रवेश
अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था असताना कार्यकर्त्यांनी प्रवेश कसा मिळवला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या कार्यकर्त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आणि क्यूआर कोड स्कॅन करुन समिटच्या सभामंडपात प्रवेश केला. सर्वांनी स्वेटर आणि जॅकेट वरून घातले होते आणि आतून मोदी व ट्रम्प यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट घातले होते.
भाजपचे आरोप, युवक काँग्रेसचे सडेतोड उत्तर
एका आंतरराष्ट्रीय समिटमध्ये काँग्रेसने अशा प्रकारे आंदोलन करुन हिंदुस्थानची प्रतिमा मलिन केली. या आंदोलनाची योजना राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आखण्यात आली. त्यावेळी राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी या उपस्थित होत्या, असा दावा भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी केला. त्यावर युवक काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सडेतोड उत्तर दिले. युवक काँग्रेसने म्हटले की, 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू असताना जगाची नजर हिंदुस्थानवर होती, त्यावेळी भाजपने देशभरात आंदोलन केले होते. तेव्हा देशाची प्रतिष्ठा धोक्यात नव्हती का? लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार आहे, असे युवक काँग्रेसने म्हटले.






























































