
>> मेधा पालकर
पुण्याच्या बदलत्या रूपात अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या, पण प्रभात रोडच्या अगदी सुरुवातीला अन्नाचा खमंग सुवास दरवळणारे एक नाव पाच दशकांनंतरही तितक्याच दिमाखात उभे असलेले ‘दर्शन’ हॉटेल. त्याचं वेगळेपण असं की, यांनी त्याकाळी कमवा शिका योजना राबवून विद्यार्थी घडविले आहेत. हे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठय़ा पदावर काम करत आहेत. दर्शनला सुवर्ण वर्ष झाल्यानिमित्ताने राज्याच्या कानाकोपऱयात असलेले हे अधिकारी एकत्र जमले, त्यांच्याशी खास संवाद साधला.
1976 साली शीतल आहुजा यांनी या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पुण्यातील प्रसिद्ध ‘द्वारिका’ रेस्टॉरंटचे संस्थापक लालजीभाई ठक्कर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सुरुवातीला हॉटेल व्यवसाय सोपा वाटला असला तरी, वास्तवात तो अपार कष्टाचा होता. पहाटेच्या वेळी स्वत मंडईत जाऊन भाजीपाला पारखून घेण्यापासून ते रात्री स्वत शटर ओढेपर्यंत, शीतलजींनी ‘दर्शन’चा पाया स्वहस्ते रचला. सुरुवातीला केवळ ज्यूस बार असलेल्या या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीनुसार एक-एक पदार्थ वाढत गेला आणि आज 150 पेक्षा जास्त पदार्थांची रेलचेल असलेले हे पुण्याचे आवडते ‘फूड डेस्टिनेशन’ बनले आहे.‘दर्शन’च्या यशाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यांची गुणवत्तेशी असलेली बांधिलकी. आजही येथे अजिनोमोटो, कृत्रिम रंग किंवा संरक्षक यांचा वापर पूर्णपणे निषिद्ध आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे काम करणाऱया मुलांना त्यांनी शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलं. अर्धवेळ हॉटेलचे काम आणि राहिलेल्या वेळात शिक्षण करून हे विद्यार्थी शिकले. कोणी अधिकारी झाले तर, कोणी चांगल्या पदावर नोकरीत आहे. शिक्षणचे भान ठेवून आहुजा यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
आहुजा म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अर्धवेळ कामावर ठेवले जात असे आणि त्यांना जाणूनबुजून ‘बंधू किंवा भाऊ’ म्हणून संबोधले जात असे. विद्यार्थ्यांसाठी, दर्शनमधील त्यांची नोकरी हा पहिला अनुभव होता. दरमहा मिळणारे 100 रुपये त्यांच्या पुस्तके, बस पास आणि हॉस्टेलचा खर्च भागवण्यास मदत होत असे. त्यांनी अमूल्य दैनंदिन धडे दर्शनमध्ये गिरविले. विष्णू जोशी, जे आता वित्त आणि प्रशासन व्यावसायिक आहेत, ते म्हणाले, त्यांच्याकडे संस्थेच्या चाव्या सोपवल्या जात होत्या. तो विश्वास पगारापेक्षा जास्त महत्त्वाचा होता.
‘कमवा आणि शिका’ मॉडेलमुळे विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा आणि स्वतवर आत्मविश्वास मिळाला.



























































