
अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनाऱयावरील पर्यटनाला आता अधिक ग्लॅमर मिळणार आहे. नागाव समुद्रकिनाऱ्यावर हायस्पीड वॉटर टॅक्सी धावणार असून तिचे लोकार्पण उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांना आता समुद्राच्या लाटांवर कार चालवण्याचा थरारक अनुभव घेता येणार आहे.
यावेळी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आदी उपस्थित होते. नागाव येथे हिरानंदानी कम्युनिटीजचा एकात्मिक कोस्टल टाऊनशिप प्रकल्प साकारत आहे. याच प्रकल्पाच्या अनुषंगाने सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ही विशेष हायस्पीड वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे. ही कार दिसायला एखाद्या आलिशान स्पोर्टस् कारसारखी असून ती पाण्यात अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे धावते.
येत्या काळात अलिबाग नागावला पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार आहे. वॉटर कार पर्यटकांसाठी एक मुख्य आकर्षण ठरणार असून नागावच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.
































































