आज मराठीचा जागर! स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा भव्य सोहळा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी गौरव दिन म्हणून मोठय़ा उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनेही दरवर्षी मराठी भाषा दिनी मराठीचा जागर केला जातो. ती परंपरा कायम ठेवत यंदा मरीन लाइन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन महासंघाने केले आहे. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या सोहळय़ात मराठीचा जागर करून कुसुमाग्रजांना अभिवादन केले जाणार आहे. सायंकाळी 5 वाजता सुरू होणारा सोहळा रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी लोकाधिकार महासंघाची भूमिका आणि खासगी क्षेत्रातील नोकरभरतीसाठी प्रशिक्षण याविषयी या कार्यक्रमात ऊहापोह करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी बिर्ला मातोश्रीचा परिसर भगवामय झाला आहे.

जादूची पेटी

या सोहळ्यावेळी मंदार कर्णिक संयोजित प्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संयोजक आदित्य ओक आणि सिंथेसायझर वादक सत्यजित प्रभू यांच्या बहारदार सादरीकरणातून ‘जादूची पेटी’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘ठरवून टाका पुरते पक्के, मराठी माणूस शंभर टक्के’ असा नारा देत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ सरकारी कार्यालयांमध्ये मराठी कर्मचाऱ्यांचा टक्का वाढावा यासाठी सातत्याने कार्य करत आहे. त्याबरोबरच मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृती टिकवण्यासाठी महासंघ सतत झटत असतो. उद्या मराठी भाषेचा जयघोष करण्यासाठी महासंघाने आयोजित सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

लोकाधिकार महासंघाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अतिविशेष कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीस पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पी.एन.जी. ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले आहे. या सोहळ्याला शिवसेनेचे नेते, उपनेते, सचिव, लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख आदी उपस्थित राहणार आहेत. सोहळा यशस्वी करण्यासाठी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेत आहेत. या सोहळ्याला मराठी रसिकांनी आणि मराठी माणसांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.

स्थळ – बिर्ला मातोश्री सभागृह, न्यू मरीन लाइन्स

वेळ – सायंकाळी 5 वाजता