पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यासाठी पुण्याचे ‘ससून’ आरोपींसाठी ‘सेफ पॅसेज’, भाजप सदस्यांचा ‘गृह’वर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्याच्या ससून रुग्णालयातून यापूर्वी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, खुनाच्या खटल्यातील आरोपी आणि आता ‘पोक्सो’ प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला आहे. ससून रुग्णालय हे पळून जाण्यासाठी आरोपींना ‘सेफ पॅसेज’ असल्याची टीका सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत केली. पैसे दिल्यावर आरोपीला मटण, पान तंबाखू मिळतो, वेळ मिळाला तर नवरा बायकोला रुग्णालयातल्या एका खोलीतही भेटायला दिले जाते, अशा शब्दात भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहखात्यावर निशाणा साधला.

पुण्यात बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचारात पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केलेल्या एका आरोपीने ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या बाथरुमच्या काचा फोडून पलायन केल्याची घटना या महिन्यात घडली. त्यावर शिवसेना आमदार हारुन खान, भाजपचे मोहन मते यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

रुग्णालातून गँग चालवतात

ससून रुग्णालयातील ही पहिली घटना नाही. पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर रक्ताचे नमुने याच रुग्णालयात बदलले होते. रुग्णालयाच्या गेटवर एक हजार कोटी रुपयांचे एमडी सापडले होते. रुग्णालयात एखादा आरोपी गेला तर रुग्णालयाच्या आतील यंत्रणा मदत करते. रुग्णालायतून गँग चालवतात. हे पोलिसांनाही माहिती आहे. आता हे सर्व नेटफ्लिक्सच्या मालिकांमधूनही पुढे यायला लागले असल्याचे शिवसेना आमदार वरुण सरदेसाई म्हणाले.