
कोकण रेल्वेमधील प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांबाबत रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी कोकण रेल्वेचे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) संतोष कुमार झा यांची भेट घेतली. रेल्वे बोर्डाच्या नवीन आदेशानुसार कोकण रेल्वेतील गेटमेन भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, 13 कर्मचाऱयांची कालबद्ध पदोन्नती आदी मागण्यांकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. त्यावर सीएमडींनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. शिष्टमंडळात रेल कामगार सेनेचे सरचिटणीस व शिवसेना उपनेते दिवाकर देव (बाबी), कार्याध्यक्ष संजय जोशी यांचा समावेश होता. तसेच कोकण रेल्वेचे संचालक (वित्त) राजेश भडंग उपस्थित होते. कोकण रेल्वेतील 13 कर्मचाऱयांच्या एमएसीपी (कालबद्ध पदोन्नती) प्रकरणाबाबत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विषयावर तत्काळ सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर सीएमडींनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या जमीनधारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी कोकण रेल्वेच्या ग्रुप डी आणि सी भरतीमध्ये त्यांना प्राधान्याने नोकऱयांमध्ये सामावून घ्यावे, अशी ठोस मागणी करण्यात आली. बैठकीला रेल कामगार सेना (कोकण रेल्वे) सरचिटणीस राजू सुरती, मुंबई विभागीय अध्यक्ष चंद्रकांत विणरकर, विभागीय सचिव तुकाराम कोरडे, रनिंग स्टाफ प्रमुख प्रशांत कमानकर, कोकण रेल्वे पदाधिकारी जयसिंग देशमुख, मिनाझ झारी, गजानन गायकर, नागराज देवाडिगा, विल्सन लोबो, सामी नागरकर उपस्थित होते.




























































