अजित पवारांच्या विमान अपघाताला वैमानिक जबाबदार, धावपट्टी दिसत नसतानाही लॅण्डिंगचा प्रयत्न; एएआयबीच्या प्राथमिक अहवालात ठपका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामधील निधनाला महिना उलटल्यानंतर एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा (एएआयबी) प्राथमिक अहवाल आज जाहीर झाला. यामध्ये पायलटने दृश्यमानता कमी असताना विमान लँडिंग केल्यामुळेच अपघात झाल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने अपघाताला वैमानिकच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातप्रसंगी बारामती विमानतळावर खराब हवामान आणि पायाभूत सुविधांचा अभाव होता, असे धक्कादायक दावेही या अहवालात करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार 28 जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीला पोहोचले असताना लँडिंग करताना हा अपघात झाला. मात्र या अपघाताबाबत सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनीही अपघाताची सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. या अपघाताची हवाई उड्डाण मंत्रालयाच्या ‘एएआयबी’, सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. अपघातानंतर तब्बल एक महिन्याने ‘एएआयबी’ने 22 पानी प्राथमिक अहवाल आज जाहीर केला. अपघातावेळी नेमक्या कोणत्या त्रुटी आढळल्या आणि कोणत्या मुद्दय़ांवर तपास सुरू आहेत याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्रुटी दूर कराव्यात अशा सूचना ‘डीजीसीए’ला दिल्या आहेत.

अपघात कसा घडला?

  •  मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या व्हीएसआर कंपनीच्या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन पायलट, एक केबिन क्रू आणि आणखी एक प्रवासी होता.
  •  या व्हीआयपी फ्लाईटने बारामती विमानतळावरील रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला लँडिंग करता आले नाही. त्यामुळे वैमानिकाने गो-अराऊंड केले.
  •  दुसऱ्या प्रयत्नात फिल्ड इन साईट असा संदेश दिला. परंतु एटीसीने त्यावेळी 3 किलोमीटर इतकी दृश्यमानता नोंदवली होती. ‘व्हीएफआर’ नियमांनुसार दृश्यमानता पाच किलोमीटर पाहिजे. त्यामुळे नियमाप्रमाणे दृश्यमानता कमी होती.
  •  लँडिंग करत असताना विमान रनवेच्या डावीकडे 50 मीटर अंतरावर असलेल्या झाडावर आदळले आणि आगीत जळून खाक झाले.

रनवेवर खडी, सुविधांचा अभाव

प्राथमिक अहवालात बारामती विमानतळावरील अनेक त्रुटी आणि सुविधांच्या अभावांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. बारामती विमानतळ हे ‘अनकंट्रोल्ड एअरफिल्ड’ असून, तेथे एअर ट्रफिक कंट्रोल सुविधा नाही. रनवेवर बारीक खडी आहे.

धुके असताना केले लँडिंग

बारामतीमध्ये ‘मॅट’ सुविधा नाही. उपग्रह चित्रांनुसार त्यादिवशी बारामती विमानतळ परिसरात हलके धुके होते. तरीही लँडिंगचा प्रयत्न झाला. विमानतळावरील रनवे मार्पिंग स्पष्ट नाही याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

विमान कोसळल्यानंतर आग लागली. या उष्णतेमुळे फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाला. मात्र, रॉडेटा डाऊनलोड करण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीटमधील संभाषण तपासण्यासाठी अमेरिकन कंपनीची मदत घेण्यात येईल.