विज्ञान रंजन – रंगात रंगतो…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

आज होळी पौर्णिमा… उद्या खरं तर धूलिवंदन, पण अनेक ठिकाणी फाल्गुन कृष्ण पंचमीला ‘रंगपंचमी’ साजरी केली जाते. ही सोयीची आणि सुट्टीची गोष्ट. यंदा मात्र धूलिवंदनाच्या दिवशी पंचागात पौर्णिमाच आहे आणि फाल्गुन कृष्ण प्रतिपदा म्हणजे फाल्गुन महिन्याच्या दुसऱया पंधरवड्यातली पौर्णिमेनंतरची पहिली तिथी, 3 मार्च रोजी आहे.

आपला आजचा विषय होळीच्या निमित्ताने रंगांचा. ‘आया होली का त्योहार उडे रंग की बौछार’ हे सी. रामचंद्र (चितळकर) यांनी संगीतबद्ध केलेलं किंवा ‘शोले’मधलं ‘होली के दिन दिल खिल जाते है, रंगों में रंग मिल जाते है’ अशी गाणी कानावर पडतील. मराठीतही फार पूर्वीचं ‘नको रे कृष्णा रंग टाकू चुनरी भिजते’ हे सुशीलाबाई टेंबे यांचं गाणं आज किती जणांना आठवतं ठाऊक नाही, पण ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ हे सुरेश भट यांचं ललादीदींनी गायलेलं गाणं नक्कीच आठवेल. हे गीतरंग स्मरण व्हायचं कारण ‘रंगपंचमी’ हेच आहे. यानिमित्ताने आधी रंगामधलं विज्ञान रंगरंजन जाणून घ्यायचा थोडक्यात प्रयत्न करू या. सर्व सजीवांना निसर्गाने निर्माण केलेले विविध रंग जन्मापासूनच जाणवतात. काही रंग नेत्रसुखद, तर काही भयावहसुद्धा वाटतात. हे ज्याच्या त्याच्या रंगजाणिवेवर अवलंबून असते. रंगांधत्व असलेल्या मोजक्या व्यक्ती वगळता सर्वांनाच त्यांच्या नेत्ररचनेनुसार आणि मेंदूतील रंगसंवेदनांप्रमाणे एखादी गोष्ट ‘रंगीत आहे’ हे समजतं. रंगांधत्व असेल तर मात्र सर्वच गोष्ट कृष्णधवल रंगात किंवा त्यांच्या मधल्या करडय़ा रंगाच्या (ग्रे) छटांमध्ये (शेडस्) दिसू लागतात.

आपल्याला ‘रंग’ दिसतात हे प्रकाशामुळे. डोळ्यातील सुमारे 6 लक्ष ‘कोन सेल्स’ पिंवा शंकू पेशींच्या जाणिवेमुळे हे शक्य होते. या ‘शंकू’ पेशींमधील फोटो पिग्मेन्ट वेगवेगळ्या प्रकाश तरंगलांबीच्या तसाच प्रतिसाद देतात. एखाद्या वस्तूवर प्रकाश पडल्याशिवाय ती आपल्याला दिसूच शकत नाही. मात्र ज्यावर प्रकाशकिरणे पडतात, त्या वस्तूमध्ये त्यापैकी कोणते झिरपतात (अॅब्सॉर्ब होतात), कोणते परावर्तित होतात (रिफ्लेक्शन) आणि कोणते वगळले जातात (एमिशन) या सगळ्यातून आपल्याला ती गोष्ट ‘रंगीत’ दिसते. प्रत्येकाची रंगजाणीव सारखीच असेल असं नाही. त्यामुळे एखाद्याला एखादा रंग जसा दिसेल किंवा भावेल (म्हणजे आवडेल) तसाच तो दुसऱ्या व्यक्तीला प्रतीत (पर्सिव्ह) होईल असं नाही. म्हणूनच आपापली रंगांची आवडही असते. सूर्यप्रकाशात सात रंग सामावलेले असतात हे माणसाला नैसर्गिक ‘इंद्रधनुष्या’मुळे सर्वात आधी समजलं. निसर्ग विविधरंगी दिसतो तो त्यातील झाडं-पानं, फुलं-फळं, कीटक, प्राणी-पक्षी आणि माणसंही वेगवेगळ्या रंगाची दिसण्याचं कारण या सर्व सूक्ष्म ते महाकाय वस्तूंची प्रकाशकिरणे शोषण्याची परावर्तित करण्याची क्षमता वेगवेगळी असल्यामुळेच. निळ्या रंगाचं विकिरण (रिफ्रॅक्शन) अधिक होत असल्याने दिवसा केवळ सूर्यप्रकाश असतानाच आकाश तसंच समुद्राचं पाणी निळं दिसतं. सूर्यप्रकाश मावळला की आकाश काळंकुट्ट दिसू लागतं. समुद्राकाठी दिवे नसतील तर केवळ त्याच्या लाटांची ‘गाज’ ऐकू येते.

निसर्गापासून प्रेरणा घेऊन माणसानेही विविध ‘रंगसृष्टी’ निर्माण केली. सुरुवातीला पाना-फुलांची, रंगीत दगडांची पूड करून त्याचे पक्के रंग बनवले गेले. मुलींच्या हातावरची ‘मेंदी’ हा तर शुभ सोहळ्यातला आवश्यक आविष्कार असतो. विडय़ाचं (नागवेलीचं) पान रंगतं ते त्यात चुना आणि कात ही खाद्य ‘रसायनं’ मिसळल्यामुळे. अशा अनेक गोष्टींचा शोध लागत शुभ्र कपडे, लाकडी वस्तू एवढंच काय भित्तीचित्रे किंवा दगडी शिल्पेसुद्धा ‘रंगीत’ केलेली आढळतात. अनेक प्राचीन गुंफांमधून अशा रंगचित्रांचा वारसा आजही मनाला मोहित करतो. आपल्या महाराष्ट्रातील ‘अजिंठा’ येथील लेण्यांमधली रंगचित्रे हे त्याचं उत्तम उदाहरण.

नंतरच्या काळात पेट्रोलिय पदार्थ आले. रसायनशास्त्र्ा विकसित झालं आणि जलरंगांप्रमाणे तैलरंगसुद्धा निर्माण होऊ लागले. आता ते ठायी ठायी विपुल प्रमाणात आढळतात. मात्र कृत्रिम रंगांच्या बाबतीत अनेकांना अनेक रंगांची ‘अॅलर्जी’ (वावडे) असू शकते. त्यामुळे त्वचा, डोळे यांना इजा होईल असे आणि फार काळ त्वचेवर चिकटणारे रंग ‘रंगपंचमीला’ वापरू नयेत. नैसर्गिक रंगच वापरावेत. अशाच रंगांची होळी राजस्थानातील भरतपूर जवळच्या ‘डिगी’ पॅलेसमध्ये तिथल्या राजेशाहीच्या काळात रंगायची. त्यासाठी विविध रंगांचे मोठे दगडी चॅनेल (नाले) दगडी तोटय़ांमधून रंग सोडायचे आणि पुढच्या तलावातील कारंजामधून विविध जलरंगांची उधळण व्हायची. हल्ली क्वचित होणाऱया या रंग सोहळ्याचा दुर्मिळ फोटो विश्वास भट यांनी पाठवला. तोच लेखासोबत आहे. तेव्हा रंगांमध्ये जरूर रंगून जा, परंतु प्रकृतीची आणि पर्यावरणाची काळजी घेऊनच. कारण निसर्गाचा ‘बेरंग’ करण्याचा अधिकार आपल्याला नाही.