
मद्य धोरण प्रकरणात न्यायालयाने खटला चालवण्यास नकार देत हे प्रकरण म्हणजे सीबीआयने रचलेले कथानक होते, असा निष्कर्ष नोंदवत दिलेला निकाल ही भारतीय जनता पक्षाला चपराक आहे. या प्रकरणात अडकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कट रचला होता. तो यशस्वी झाला नाही. खरं तर मोदीच भ्रष्ट आणि भित्रे आहेत. आता भाजपच्या सत्तेच्या अस्ताची उलटी गिनती सुरू झाली आहे, अशा शब्दांत ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हल्ला चढवला.
दिल्लीच्या जंतरमंतर येथील सभेत त्यांनी भाजपवर टीका करताना पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा यांना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी यांचा भ्रष्ट आणि भयभीत झालेला सत्ताधीश असा उल्लेख करत केजरीवाल म्हणाले की, मी कट्टर इमानदार आहे, हे न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून सिद्ध झाले आहे. पंतप्रधान मोदी यांना सर्वांची भीती वाटते. जेव्हा एखादा जुलमी सत्ताधीश भयभीत होतो, हा त्याच्या सत्तेचा अंत होत असल्याचा संकेत असतो. आजपासून भाजपच्या सत्तेचा अस्त होण्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. 140 कोटी हिंदुस्थानी हुकूमशाही सरकार उखडून फेकण्यासाठी एकत्र येतील, असे केजरीवाल म्हणाले.
मोदी आणि शहा यांनी 4 वर्षे त्रास दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. मोदी ‘विकसित भारत’बद्दल बोलतात. मात्र लोकांना ‘राहण्यालायक भारत’ हवा आहे. ‘परीक्षा पे चर्चा’सारखे नाटक बंद करून मोदींनी प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असा टोला केजरीवाल यांनी लगावला.
भाजपच्या सत्तेत सर्व क्षेत्रांची माती
30 वर्षांनी वर्ष 2014मध्ये देशात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. मात्र नागरिकांच्या आयुष्यात काही बदल झाला आहे का? भाजपच्या 12 वर्षांच्या सत्तेदरम्यान सर्व क्षेत्रांची माती झाली आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
महिला खासदारांना घाबरून मोदींची दांडी
महिला खासदारांच्या भीतीने मोदी एक दिवस संसदेमध्ये गेले नाहीत. मोदींनी शास्त्रज्ञ आणि मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱया सोनम वांगचूक यांना तुरुंगात टाकले. मोदी हे ट्रम्प यांनाही घाबरलेले आहेत, असा टोला केजरीवाल यांनी लगावला.






















































