शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचा उत्सव, बच्चे कंपनीने चितारली ‘माझी मुंबई’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबईसंकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धेला संपूर्ण शहरभरात मोठा प्रतिसाद लाभला. शहर आणि उपनगरांतील विविध 51 ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत जवळपास
86 हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चित्रामध्ये स्वतःच्या कल्पनेतील माझी मुंबईचितारली. बच्चे कंपनीचा उत्साह त्यांच्या शिक्षकपालकांसह सर्वांनाच थक्क करणारा आणि कौतुकाचा विषय ठरला.

 बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान आणि मैदानांमध्ये रविवारी ही ‘माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत लहानग्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि रंगसंगती साधत विविध विषयांवरील आकर्षक चित्रे रेखाटली. ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेतील लहान मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अनेक मान्यवरांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन लहानग्यांना दाद दिली.

महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर-पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदानातील स्पर्धेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. येथील उपक्रमात घाटकोपर परिसरातील चिमुकल्यांनी सहभागी होऊन आपल्या कल्पकतेने मुंबईचे विविध पैलू कागदावर उतरवले. स्पर्धेतील सहभागी मुलांशी संवाद साधताना त्यांच्यातील निरागसता आणि मुंबईबद्दलचे त्यांचे प्रेम पाहून मन प्रसन्न झाले. प्रत्येक चित्रात मुलांची नवी आशा आणि भविष्यातील प्रगत मुंबईची झलक पाहायला मिळाली, असे मनोगत महापौर रितू तावडे यांनी कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले. उपक्रम यशस्वी करणाऱया सर्व शिक्षक, पालक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे महापौरांनी कौतुक केले.

पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदानात मोठय़ा उत्साहात स्पर्धा पार पडली. याप्रसंगी ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सहाय्यक अधिकारी सोनावणे, शिवसेना

उपविभागप्रमुख अजित भायजे, शाखाप्रमुख विशाल चावक, घाटकोपर पूर्व विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, कार्यालय प्रमुख वसंत पाटील, लौकेश फेफडे, दिनकर मांडले उपस्थित होते.