
कोकणातील लोकप्रिय उत्सव मानल्या जाणाऱ्या शिमगोत्सवासाठी मोठय़ा प्रमाणावर मुंबईकर-ठाणेकर गावी निघाले आहेत. रविवारच्या सुट्टीचा योग साधत अनेकांनी प्रवास सुरु केला. मात्र, ‘तेजस एक्सप्रेस’च्या तब्बल 7 तासांच्या विलंबाने प्रवाशांचा हिरमोड केला. मुंबई-ठाण्यातून कोकणात निघालेल्या प्रवाशांची प्रवासाच्या सुरुवातीलाच रखडपट्टी झाली.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यातील अनेक गावांत शिमगोत्सवाला सुरुवात होत आहे. काही गावांमध्ये होळीपूर्व विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्या कार्यक्रमासाठी अनेक मुंबईकर-ठाणेकरांनी गावाकडे मोर्चा वळवला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य आणि कोकण रेल्वेने जादा गाडय़ांची व्यवस्था केली आहे. मात्र या गाडय़ा चालवताना नियमित गाडय़ांचे वेळापत्रक सुस्थितीत ठेवण्यास रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे. आरामदायी प्रवास म्हणून ‘तेजस एक्सप्रेस’ला पसंती देणाऱया प्रवाशांना रविवारी या गाडीच्या तब्बल 7 तासांच्या विलंबाचा मनस्ताप सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुटणारी ही एक्सप्रेस रविवारी दुपारी 12 वाजून 58 मिनिटांनी कोकणच्या दिशेने रवाना झाली. सात तासांच्या विलंबामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातच ताटकळत बसावे लागले. कोकण रेल्वे मार्गावर मागील अनेक दिवसांपासून मॉन्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी ब्लॉक सुरू आहेत. त्यामुळे आधीच मुंबईतून कोकणात जाणाऱया आणि येणाऱया अनेक एक्सप्रेस उशिराने धावत आहेत. ऐन शिमगोत्सवात ’तेजस एक्सप्रेस’ला सात तासांचा विलंब झाल्याने रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
रेल्वे मंत्र्यांना प्रीमियम सेवेबद्दल देणेघेणे नाही!
रेल्वे मंत्रालयाकडून कोकण रेल्वेला सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रेल्वे मंत्र्यांना प्रीमियम सेवेबद्दल काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. ट्रेन क्र. 22119 मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस सतत 5 ते 10 तास उशिरा धावत आहे. ही गाडी मडगावऐवजी करमळी किंवा थिवीपर्यंत चालवण्यात यावी, जेणेकरून गाडी वेळेवर चालवणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया महापदी यांनी दिली.




























































