
देशभरात 1 मार्चपासून ‘सिम बाइंडिंग’ हा नवीन नियम लागू झाला आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त स्मार्टफोनवर व्हॉट्सऍप वापरले जात असेल तर ते बंद होईल. नव्या नियमामुळे देशभरातील कोटय़वधी लोकांचे अकाऊंट बंद होणार आहे.
‘सिम बाइंडिंग’ नियमासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती, ज्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या नियमाचा परिणाम टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या इतर मेसेजिंग ऍप्सवरही होणार आहे.
हिंदुस्थानात जवळपास 85.3 कोटी व्हॉट्सऍप युजर्स आहेत. यातील अनेक जण ‘लिंक्ड डिव्हाइस’ फीचरचा वापर करून एकापेक्षा जास्त स्मार्टफोनवर व्हॉट्सऍप वापरतात. मात्र आता हे चालणार नाही.
ऑक्टिव्ह सिमकार्ड अनिवार्य
सिम बाइंडिंग नियम लागू झाल्यानंतर ज्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टिव्ह सिमकार्ड नाही, त्या फोनमध्ये व्हॉट्सऍप चालणार नाही. एकाच सिमच्या मदतीने दोन किंवा अधिक स्मार्टफोनवर व्हॉट्सऍप वापरणाऱयांचे अकाऊंट बंद होण्याची शक्यता आहे. अशा युजर्सची संख्या 2 कोटींहून अधिक असल्याचे समजते.
दिलासादायक बाब म्हणजे लॅपटॉप आणि पीसीवर व्हॉटसऍप पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. दूरसंचार विभागाने ‘टेलिकॉम सायबर सुरक्षा नियमां’तर्गत सिम बाइंडिंग अनिवार्य केले आहे.
यामुळे सायबर गुन्हेगार आता सहजपणे लोकांची फसवणूक करू शकणार नाहीत. डिजिटल अरेस्ट प्रकरणे कमी होतील. फेक आयडीने केल्या जाणाऱ्या गुह्यांचे प्रमाण कमी होईल.

























































