‘चांद निकला’ म्हणणे ही अश्लील शेरेबाजी नव्हे! विनयभंगप्रकरणी हायकोर्टाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

एखाद्या महिलेला उद्देशून ‘चाँद निकला’ (चंद्र उगवला) अशी टिपणी करणे, ही बाब अश्लील किंवा  लैंगिक छळाच्या असलेल्या शेऱ्याच्या कक्षेत येत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने दिला. एका गृहनिर्माण संस्थेच्या व्हॉट्सऍप ग्रुपमधील टिपणीवरून गुरुग्राममधील रहिवाशावर दाखल झालेला गुन्हा न्यायालयाने रद्द केला.

गुरुग्राममधील एका सोसायटीत राहणाऱ्या महिलेने दिलेल्या फियार्दीवरून संशयितावर गुन्हा दाखल झाला होता. ही महिला एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिका आहे. सोसायटीच्या सांस्कृतिक मंडळाच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर धीरज गुप्ता या रहिवाशाने महिलेच्या प्रोफाईल फोटोवर ‘जाने कितने दिनों के बाद सोसायटी में अब चाँद निकला’ अशी कमेंट केली होती. तक्रारदार महिलेचा आरोप होता की, ही टिपणी लैंगिक छळासह विनयभंग करण्याच्या उद्देशाने केली होती. सोसायटीच्या आगामी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्याच्या षडयंत्राचा हा भाग असल्याचेही आरोप त्यांनी केला होता.

  या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती शालिनी सिंह नागपाल म्हणाल्या, संबंधित टिपणी जरी ‘अयोग्य’ असली तरी ती भारतीय दंड संहितेच्य कलमांनुसार अश्लीलता, लैंगिक छळ किंवा विनयभंगाच्या व्याख्येत बसत नाही.  ‘चाँद निकला’ या वाक्यात कोणतीही लैंगिक छटा नाही. तसेच ज्या वेळी ही कमेंट केली गेली, तेव्हा तक्रारदार महिला त्या ग्रुपची सदस्यही नव्हती. त्यामुळे हा थेट त्यांच्यावर केलेला हल्ला मानला जाऊ शकत नाही.

हा विनयभंगाचा गुन्हा नाही

एखाद्या महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा संबंधित कृतीमुळे तिच्या शालीनतेला किंवा सन्मानाला धक्का लागतो. सदर टिपणी बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध गाण्याचा संदर्भ असल्याचे दिसते, ज्याचा उद्देश महिलेच्या लैंगिक प्रतिष्ठsला धक्का लावण्याचा नव्हता, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.