
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक शेअर बाजारासह हिंदुस्थानातील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स २,७४३ अंकांनी म्हणजेच ३.३८% ने घसरून ७८,५४३ वर उघडला. तर निफ्टी ५१९ अंकांनी म्हणजेच २.०६% ने घसरून २४,६५९ वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी १,३०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. त्यानंतर बाजार थोडा सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
बाजार सुरू होताच झालेल्या मोठ्या घसरणीनंतर तो काही वेळातच सावरला. सेन्सेक्स १,००० अंकांनी किंवा १.२१% ने घसरून ८०,२८२ वर व्यवहार करत होता आणि निफ्टी ३०० अंकांनी घसरून २४,९०० च्या खाली आला. 9.45 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 198.05 अंकांनी म्हणजेच 0.79% घसरून 24,982 . 60 वर व्यवहार करत आहे. तर सेन्सेक्स 669.17 अंकांनी म्हणजेच 0.82% घसरून 80,618.02 वर व्यवहार करत आहे.
तसेच या युद्धाचा परिणाम तेल, नैसर्गिक वायू, सोने आणि चांदीवरही झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये १०% पेक्षा जास्त वाढ दिसून येत आहे. जर युद्ध सुरूच राहिले तर ही बाजारातील घसरण आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात.
बीएसईच्या टॉप ३० पैकी २९ शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ज्यामध्ये फक्त बीईएलचे शेअर्स १ टक्के वाढले. इंडिगोचे शेअर्स जवळजवळ ५ टक्के, एल अँड टीचे शेअर्स जवळजवळ ४ टक्के, अदानी पोर्ट्सचे शेअर्स ३ टक्के आणि एटरनलचे शेअर्स २ टक्के घसरले. शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले. बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये लक्षणीय घट झाली. शुक्रवारी ४६३.५० लाख कोटींवर असलेले बीएसई मार्केट कॅप सोमवारी सुमारे ४५७.५० लाख कोटींवर घसरले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

























































