
मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे समीकरण बदलून टाकणारी आणि प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली ‘शिवनेरी’ बस आता राज्याच्या कानाकोपऱयात पोहोचणार आहे. एसटी महामंडळाची ही प्रतिष्ठत आणि आरामदायी बस सेवा लवकरच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांदरम्यान सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना आता आरामदायी बस सेवेचा लाभ मिळणार आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विस्ताराची घोषणा केली आहे. यामुळे राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक आधुनिक चेहरा मिळणार आहे. सन 2002मध्ये सुरू झालेली शिवनेरी सेवा तिच्या वक्तशीरपणासाठी आणि उत्कृष्ट आसनव्यवस्थेसाठी ओळखली जाते. तिकीट दर इतर बसेसच्या तुलनेत थोडे अधिक असूनही सुरक्षित आणि सुखकर प्रवासामुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांनी या सेवेला नेहमीच पसंती दिली आहे. ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात असल्याने आता तिचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विस्तारासाठी राज्य परिवहन महामंडळाने 200 नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रियादेखील सुरू केली आहे. या नवीन ताफ्यामध्ये 30 विशेष ‘स्लीपर शिवनेरी’ बसेसचा समावेश असणार आहे, ज्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना बेड-कोचची लक्झरी सुविधा उपलब्ध होईल.
विशेष म्हणजे, या विस्तारित सेवेमध्येही राज्य सरकारचे सवलतीचे धोरण लागू राहणार आहे. महिला प्रवाशांना आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळेल, तर 75 वर्षांवरील नागरिकांना या आलिशान बसमधून मोफत प्रवास करता येईल. सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱया पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बसेसला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता नव्या मार्गांवरही शिवनेरीला प्रवाशांची मोठी पसंती मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हे आहेत प्रस्तावित मार्ग
नाशिक-पुणे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर,
नाशिक-जळगाव-धुळे, पुणे-कोल्हापूर,
पुणे-सांगली, पुणे-सोलापूर, नागपूर-चंद्रपूर,
नागपूर-अमरावती-अकोला
























































