दिवसाला 35 हजारांचे मटण; कुनोच्या चित्त्यांवर वर्षाला एक कोटी खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील चित्त्यांची संख्या वाढावी म्हणून नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवाना येथून चित्ते आणण्यात आले आहेत. यातील काही मादी चित्त्यानी बछडय़ांना जन्म दिला आहे. त्यामुळे देशातील चित्त्यांची संख्या वाढली, मात्र अजूनही चित्ते खुल्या जंगलात रुळलेले नाहीत. मोजकेच चित्ते खुल्या जंगलात सोडण्यात आले. त्यातील काहींना संघर्षामुळे परत आणावे लागले. त्यामुळे या चित्त्यांना आयतेच खाऊ घालावे लागत आहे. एका वर्षात कोटय़वधी रुपयांचे मटण हे चित्ते खातात. कुनोतील चित्ते तर दिवसाला 35 हजारांचे मटण फस्त करतात.

मध्य प्रदेश विधानसभेत चित्त्यांवरील खर्चाची माहिती देण्यात आली. त्यानुसार कुनो जंगलातील बिबटे मुबलक प्रमाणात मटण खातात, एका वर्षात ते 1.27 कोटी रुपयांचे मांस खातात.

सध्या 32 चित्ते
चित्त्यांना शिकार करण्यासाठी जंगलात सोडण्यात आले असले तरी बकरीचे मांस खरेदी केले जात आहे. चित्त्यांची संख्या किती, दरवर्षी किती पैसे खर्च केले जातात आणि त्यांना दररोज किती शेळय़ा खायला दिल्या जातात, याबाबतचा प्रश्न काँग्रेस आमदार मुकेश मल्होत्रा यांनी विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, सध्या कुनो वन्यजीव विभागात 32 चित्ते आहेत, परंतु त्यात नवजात बछडय़ांचा समावेश नाही.

बकरीचे मांस… आवडते अन्न
मध्य प्रदेशातील कुनो जंगलात चित्त्यांची संख्या वाढत आहे. सध्या मध्य प्रदेशात एकूण चित्त्यांची संख्या 38 आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात राहणाऱया चित्त्यांना बकरीचे मांस दिले जाते. मटण हे त्यांचे आवडते अन्न आहे. सरकार त्यांच्या अन्नावर दररोज 35,000 रुपये खर्च करते, असे विधानसभेत सांगितले. मध्य प्रदेश सरकारने बुधवारी सभागृहाला माहिती दिली की, 2024-25 या आर्थिक वर्षात चित्त्यांसाठी बकरीचे मांस खरेदी करण्यासाठी 1 कोटी 27 लाख 10 हजार 817 रुपये खर्च करण्यात आले.