
सभागृहात विरोधकांच्या प्रस्तावावर बोलायला वेळ देत नसल्यामुळे शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू आज प्रचंड संतप्त झाले. विरोधकांना बोलायला देत नसाल तर आम्ही घरी जातो. आम्ही हे सर्व बंद करतो, असा आक्रमक पवित्रा सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत घेतला.
विधानसभेत तालिका अध्यक्ष समाधान अवताडे यांनी नियम 293 अन्वयेच्या प्रस्तावावर चर्चा सुरू करून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना बोलण्यास संधी दिली. त्यावर सुनील प्रभू यांनी आक्षेप घेतला. सुनील प्रभू म्हणाले, तीन दिवस सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलत आहेत. विरोधी पक्षाचा प्रस्ताव आल्यावर एक मिनिटही बोलू दिले नाही. आपण एकदा ठरवा, विरोधी पक्षनेत्यांनी बोलायचे नसेल तर आम्ही घरी जातो. आम्ही हे सर्व बंद करतो. परवा पावणे दोन तास सभागृह चालवले. सत्ताधारी पक्षाच्या सर्व सदस्यांना बोलायला दिले आणि तेव्हा असे ठरले की, सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्यांची भाषणे झाली. पुन्हा सभागृह सुरू होईल तेव्हा विरोधी पक्षाचा 293चा प्रस्ताव सुरू केला, पण आता अजूनही सत्ताधारी पक्षाला बोलायला देत आहेत याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांना अजून बोलायला वेळ आहे, असे तालिका अध्यक्ष समाधान अवताडे यांनी सांगितले.
विरोधी सदस्यांना किती वेळ दिलात?
त्यावर सुनील प्रभू अधिकच संतप्त झाले. मला आता माहिती द्यावी की, सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव या सभागृहात किती तास चालला? विरोधी पक्षाच्या सदस्यांचा किती वेळ होता, अपक्षांचा किती वेळ होता याची माहिती मला सचिव विभागाने द्यावी अशी मागणी केली.























































