
नागपूरमधील एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 19 लोकांचा मृत्यू झाला. नागपुरात स्फोटकांचे असे 11 कारखाने असून त्यामध्ये गेल्या दीड वर्षांत 43 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतरही सरकार ढिम्म असून काहीच कारवाई केलेली नाही, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. स्फोटकांच्या कारखान्यांमध्ये केवळ 300 रुपये मजुरीसाठी जीव धोक्यात घालून हे मजूर काम करतात. गरीबांच्या जिवाची या सरकारला काहीच किंमत उरलेली नाही का? रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात 20 मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात 19 महिलांचा समावेश आहे. त्यांची कुटुंबे आणि मुले उघडय़ावर पडली आहेत. तुम्ही 15 लाख, 50 लाख देण्याची घोषणा करता. त्याने जीव परत येणार का, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला.























































