कुकडीचे आजपासून उन्हाळी आवर्तन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करत कर्जत तालुक्यातील शेतकऱयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून उद्यापासून (दि. 5) उन्हाळी आवर्तन सुरू होणार आहे. 1400 क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सर्वच चाऱयांमधून योग्य दाबाने पाणी शेतीपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

या आवर्तनाचा लाभ कर्जत तालुक्यातील तब्बल 54 गावांना होणार असून, ऊस, कांदा, मका, डाळिंब, केळी, पेरू यांसह विविध फळबागा आणि पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. तसेच पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मागील वर्षी समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने कर्जत तालुक्यात पीकाखालील क्षेत्रात वाढ झाली असून, सध्याच्या काळात पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवत होती. अशा ऐन मोक्याच्या वेळी कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू होत असल्याने शेतकऱयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.