प्रतिबंधित 4 टन मांगूर माशासह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची शिर्डीत कारवाई; चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवी आरोग्यास घातक ठरवून केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या सुमारे 4 टन मांगूर माशांची तस्करी करणाऱया पश्चिम बंगालमधील चार तस्करांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी मांगूर मासा, ट्रकसह एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेअंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

स्वपन नियम डे (वय 36, रा. बामनगज, जि. बाराशाद, प. बंगाल), मकबुल रौफ सरदार (वय 31, रा. मसलंदापूर, जि. नॉर्थ 24 परगना), कुतूब आयुब मंडल (वय 35, रा. मंदिया, जि. नॉर्थ 24 परगना) आणि मृत्युंजय मुकुल विश्वास (वय 27, रा. हाबरा, जि. नॉर्थ 24 परगना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथक 3 मार्चला शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना याबाबत माहिती मिळाली होती. पश्चिम बंगाल पासिंगचा एक ट्रक प्रतिबंधित मांगूर मासे भरून नगर-मनमाड हायवेवरील निमगाव बायपास रोड चौकातून जाणार असल्याचे समजले. माहिती मिळताच पथकाने शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक सागर काळे व त्यांच्या पथकाने निमगाव बायपास रोडवर सापळा रचला. संशयास्पद ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकच्या केबिनमध्ये आणि मागील भागात मोठय़ा प्रमाणात मांगूर मासे आढळून आले. ट्रकमधील व्यक्तींकडे विचारपूस केली असता त्यांनी पश्चिम बंगालमधील ‘मिराज’ नावाच्या व्यक्तीने मासे भरून दिले असून, ते खोपोली (मुंबई) येथील ‘भाई’ नावाच्या व्यक्तीकडे पोहोचवले जाणार असल्याचे सांगितले.

या कारवाईत 4 लाख रुपये किमतीचे 4 टन मासे आणि 25 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ नष्ट करण्यात आले आहेत. याप्रकरणी मत्स्य विकास अधिकारी प्रतिक्षा पाटेकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, रणजित गलांडे, दीपक मेढे, सागर काळे, राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, सतीश भवर, उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.