
सातारा जिल्ह्यातील दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील 112 कोटींच्या घोटाळाप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष व राज्य सहकार परिषदेचा माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर याला अटक केल्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळ्याच्या खोलात जाऊन तपास करण्यासाठी फसवणूक झालेल्या ठेवीदार व कर्जदारांना चौकशीकामी पाचारण केले आहे.
यशवंत बँकेतील या घोटाळाप्रकरणी शेखर चरेगावकरसह त्याचे नातेवाईक, संचालक, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक मिळून एकूण 50 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी याला अटक केली आहे. पोलिसांना गुंगारा देत असलेल्या शेखर चरेगावकरला पोलिसांनी 25 फेब्रुवारीला कराड तालुक्यातील विंग येथे अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखेने या घोटाळ्याचा सखोल तपास करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, रत्नगिरी जिह्यांत आहे. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या ठेवीदार तसेच कर्जदारांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीकामी हजर राहण्याचे आवाहन केले आहे. ठेवीदार व कर्जदारांनी दि. 31 मार्चपर्यंत सातारा येथे पोलीस मुख्यालयात आर्थिक गुन्हे शाखेत कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

























































