
भारताच्या युद्ध सरावात सामील झालेल्या इराणच्या युद्धनौकेस भारतीय समुद्र हद्दीत बुडवणे हे कृत्य भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखे आहे. भारत देश आमचा गुलाम झाला आहे. तो आमचे काय वाकडे करणार? ही अमेरिकेची भावना बळावत आहे ती पंतप्रधान मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कमजोर नेतृत्वामुळे. पंतप्रधान मोदी जितका काळ पदावर राहतील तितका काळ भारत जागतिक स्तरावर कमजोर व लाचार झालेला पाहावा लागेल. एकंदरीत जागतिक चित्र पाहता पंतप्रधान मोदी हे भारतावरचे मोठे संकट आहे. ते संकट दूर करावे लागेल.
आखातातील युद्धाचे चटके भारताला बसू लागले आहेत. हे चटके साधे नाहीत, तर भारताची प्रतिष्ठा व इभ्रतीला आग लावणारे आहेत. हिंद महासागरात घुसून अमेरिकेने इराणच्या युद्धनौकेवर हल्ला केला. आंतरराष्ट्रीय सागरी सीमेचे व नियमांचे हे उल्लंघन आहे. धक्कादायक बाब अशी की, इराणच्या ज्या ‘आयरिस देना’ युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला चढवला व नौका बुडवली ती नौका भारताच्या विशेष आमंत्रणावरून विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत या जहाजाचे कौतुक करण्यात आले. म्हणजे भारतात ‘पाहुणी’ म्हणून आलेल्या युद्धनौकेवर हल्ला करून अमेरिकेने शंभर नौदल सैनिकांचा बळी घेतला. भारताच्या हद्दीत भारताशी संबंधित युद्धनौकेवर हल्ला करणे ही प्रे. ट्रम्प यांची झुंडशाही आहे व ही झुंडशाही सहन करणारे पंतप्रधान मोदी भारताला जागतिक पातळीवर नामर्द ठरवत आहेत. इतकी मोठी घटना घडूनही देशाचे पंतप्रधान मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ‘थंड’ लोळागोळा होऊन बसले आहेत. या थंडपणाचा धिक्कार करावा तेवढा थोडाच! अमेरिकेचा साधा निषेधही आमचे सरकार करू शकले नाही. इराणची ‘आयरिस देना’ ही युद्धनौका भारताच्या आमंत्रणावरून आपल्याकडे आली होती व अमेरिकेने तिच्यावर हल्ला केला. त्यामुळे
या हल्ल्याची जबाबदारी
पंतप्रधान मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घ्यायलाच हवी. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे व या जनतेच्या भावनांचा विचार न करता पंतप्रधान त्यांचे राजकारण करीत आहेत. स्पेनची लोकसंख्या जेमतेम पाच कोटी आहे. हा देश नाटोचा सदस्य आहे. स्पेनच्या पंतप्रधानांनी संसदेत सांगितले की, ‘‘गाझामध्ये जे झाले तो नरसंहार आहे. इराणवरील हल्ल्यासाठी आम्ही आमची जमीन वापरू देणार नाही. कारण अमेरिका व इस्रायल हे दोन्ही देश युद्धाचे नियम पाळत नाहीत. इराणमधील मुलींच्या शाळेवर इस्रायलने बॉम्बहल्ले केले व 200 मुलींना ठार केले. हे भयंकर क्रौर्याचे उदाहरण आहे.’’ आपले पंतप्रधान मोदींनी मात्र युद्धाबाबत एक शब्दही अद्यापि उच्चारला नाही. विश्वगुरू म्हणून ज्यांचा डंका दिवसरात्र पिटला जातो त्यांनी इतक्या मोठ्या जागतिक घडामोडींवर तोंड बंद करून का बसावे? भारत ब्रिक्स शिखर संमेलनाचे ‘अध्यक्षपद’ या वेळी स्वीकारत आहे. इराणसुद्धा ब्रिक्सचा सदस्य आहे. आपल्या संमेलनाचा सदस्य असलेल्या इराणवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत आपण एक साधे निवेदनही प्रसिद्ध करू नये? इतके आपले नेतृत्व कमजोर आणि डरपोक बनले आहे? संकटसमयी आपल्या जुन्या मित्रांकडे पाठ फिरवणाऱया कोणालाही विश्वगुरूची पदवी शोभा देत नाही. भारतासारख्या देशाने अशा प्रकारच्या युद्धात एकतर तटस्थतेची, नाहीतर मध्यस्थाची
भूमिका
वठवायला हवी होती. इराणकडून मानवी मूल्यांचे उल्लंघन झाले असेल तर इराणला व इस्रायलकडून मानवतेचा बळी जात असेल तर प्रसंगी इस्रायलला कठोर शब्दांत समज देण्याइतकी मजबूत छाती भारतीय नेतृत्वाकडे असायला हवी होती. ती 56 इंच म्हणवून घेणारी छाती आता अदृश्य झाली आहे. भारताच्या युद्ध सरावात सामील झालेल्या इराणच्या युद्धनौकेस भारतीय समुद्र हद्दीत बुडवणे हे कृत्य भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखे आहे. ही घुसखोरी आहेच, पण अमेरिकेचा दहशतवाददेखील आहे. भारत देश आमचा गुलाम झाला आहे. तो आमचे काय वाकडे करणार? ही अमेरिकेची भावना बळावत आहे ती पंतप्रधान मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कमजोर नेतृत्वामुळे. बिहारचे नेतृत्व कमजोर पडल्याने ते बदलण्याची घाई भाजपला झाली व नितीश कुमारांची उचलबांगडी केली; पण नेतृत्व परिवर्तनाची खरी गरज दिल्लीत आहे. पंतप्रधान मोदी जितका काळ पदावर राहतील तितका काळ भारत जागतिक स्तरावर कमजोर व लाचार झालेला पाहावा लागेल. 56 इंचांची छाती वगैरे मिथक पिंवा दंतकथाच ठरत आहेत. बांगलादेशी घुसखोरांवर काठ्या उगारणारे भाजपाई अमेरिकेच्या या घुसखोरीवर काय बोलणार आहेत? एपंदरीत जागतिक चित्र पाहता पंतप्रधान मोदी हे भारतावरचे मोठे संकट आहे. ते संकट दूर करावे लागेल.































































