एआय : आयटी क्षेत्रासाठी कसोटीचा काळ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे आयटी क्षेत्राचे काय होणार, हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चिला जात होता, परंतु अँथ्रोपिकच्या नव्या टूल्सचे आगमन आणि त्यानंतर आयटी क्षेत्रातील समभागांत झालेली विक्रमी घसरण यामुळे या प्रश्नाला आता अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आयटी उद्योगासाठी मृत्युघंटा नाही, ती स्पर्धेची कसोटी आहे. हा काळ सजगतेचा आहे. बदल अनिवार्य आहे. प्रश्न इतकाच की, आपण त्या बदलाचे नेतृत्व करणार की त्याच्या मागे धावत राहणार? आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रासाठी ही निवड निर्णायक आहे.

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान विश्वात झालेल्या उलथापालथींकडे बारकाईने पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही संपूर्ण विचारपद्धती बदलणारी शक्ती आहे. औद्योगिक क्रांतीने उत्पादनपद्धती बदलली, इंटरनेटने माहितीचा प्रवाह बदलला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता काम करण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे करत आहे. विशेषत सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा क्षेत्रासाठी हा काळ निर्णायक ठरत आहे. हा क्षेत्राचा अस्त होत चालल्याचा इशारा नसला तरी त्याच्या पारंपरिक रचनेवर आणि उत्पन्नाच्या पायावर मोठा आघात होत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

गेल्या तीन दशकांत भारताने आयटी सेवा क्षेत्रात जागतिक पातळीवर मोठे स्थान निर्माण केले. इन्पहसिस, टीसीएस यांसारख्या पंपन्यांनी ‘सेवा’ या संकल्पनेला एक वेगळी उंची दिली. पाश्चात्त्य देशांतील मोठ्या कंपन्यांना कमी खर्चात सॉफ्टवेअर विकास, देखभाल, चाचणी आणि सल्लागार सेवा पुरविणे हा भारतीय मॉडेलचा गाभा होता. या मॉडेलचा पाया ‘लेबर आर्बिट्राज’वर उभा होता. म्हणजेच विकसित देशांपेक्षा कमी वेतनात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता या समीकरणात मूलभूत बदल घडवू लागली आहे.

आज एआय प्रणाली थेट डेटाशी संवाद साधू शकतात, विश्लेषण करू शकतात आणि अनेक वेळा मानवी हस्तक्षेपाशिवाय निर्णयसूचना देऊ शकतात. त्यामुळे सॉफ्टवेअरच्या वापरासाठी आवश्यक असलेली क्लिष्ट इंटरफेस रचना, त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि त्याभोवती उभा राहिलेला सल्लागार उद्योग यांची आवश्यकता कमी होत आहे. अनेक दशकांपासून मोठ्या सॉफ्टवेअर पंपन्यांनी ज्या पद्धतीने ग्राहकांना त्यांच्या प्रणालींमध्ये अडकवून ठेवले, त्यातून ‘इंटरफेस टॅक्स’ निर्माण झाला होता. सेल्सपर्ह्स किंवा सॅप यांसारख्या पंपन्यांच्या सोल्यूशन्सचा वापर करण्यासाठी तज्ञांची फळी लागत असे. त्या फळीला सेवा पुरविणाऱ्या भारतीय पंपन्यांना सातत्याने काम मिळत राहिले, परंतु आता एआय एजंट नैसर्गिक भाषेत आदेश स्वीकारून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यामुळे मध्यस्थीची साखळी लहान होत आहे.

या पार्श्वभूमीवर ‘कोडॅक मोमेंट’ ही संज्ञा वारंवार पुढे येत आहे. याचे कारण म्हणजे कोडॅक या कंपनीने डिजिटल कॅमेऱ्याचे तंत्रज्ञान सर्वप्रथम विकसित केले, परंतु पारंपरिक फिल्म व्यवसायाच्या नफ्यात रमल्याने तिने त्या बदलाला वेळीच स्वीकारले नाही. परिणामी बाजारपेठेत तिचे वर्चस्व कोसळले. आयटी सेवा क्षेत्रासमोरही तशीच कसोटी उभी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ उत्पादनक्षमतेत वाढ करणारी साधनसामग्री नसून ती व्यवसाय मॉडेल बदलणारी शक्ती आहे. जे या बदलाकडे केवळ ‘उपयोगी साधन’ म्हणून पाहतील, ते कदाचित मोठ्या चित्राचा अंदाज चुकवतील.

कोडिंगच्या क्षेत्रात हा बदल अधिक ठळक आहे. ओपनएआय आणि अँथ्रोपिक यांसारख्या संस्थांनी विकसित केलेली साधने आता काही मिनिटांत मोठ्या प्रमाणावर कोड निर्माण करू शकतात, त्रुटी शोधू शकतात आणि सुधारणा सुचवू शकतात. अनेक अभ्यासांनुसार एआयच्या मदतीने कोडिंगची कार्यक्षमता 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ असा की, पूर्वी दहा अभियंते करीत असलेले काम आता कदाचित सात किंवा सहा जण करू शकतील. उत्पादकता वाढ ही अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असली तरी रोजगाराच्या दृष्टीने ती अस्वस्थता निर्माण करणारी आहे.

याहूनही महत्त्वाचा बदल उत्पन्नाच्या रचनेत दिसतो. आतापर्यंत ‘टाईम अँड मटेरियल’ या तत्त्वावर पंपन्या बिलिंग करीत होत्या. म्हणजेच किती तास काम झाले, किती मनुष्यबळ लागले यावरून मोबदला ठरत असे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यावर तेच काम कमी वेळेत पूर्ण होते. परिणामी तासांवर आधारित मॉडेल कमकुवत होते. भविष्यात ग्राहक ‘आऊटकम-आधारित’ करारांकडे वळू शकतात. कामाचा परिणाम, कार्यक्षमता आणि व्यावसायिक लाभ यावर आधारित मोबदला. अशा परिस्थितीत मोठी कर्मचारी संख्या ही स्पर्धात्मक ताकद न राहता उलट ओझे ठरू शकते. लहान, चपळ आणि तंत्रज्ञानाशी जलद जुळवून घेणाऱ्या कंपन्यांना आघाडी मिळू शकते.

याच वेळी लक्षात घेण्यासारखा आणखी एक प्रवाह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरकडे वाढते लक्ष. कृत्रिम बुद्धिमत्तेची ताकद ही केवळ अल्गोरिदममध्ये नसून संगणकीय क्षमतेत आहे. प्रगत चिप्स, मोठय़ा प्रमाणावर डेटा सेंटर्स आणि वेगवान नेटवर्किंग या घटकांवर आधारित एक नवे औद्योगिक पायाभूत ढांचे निर्माण होत आहे. त्यामुळे सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांपेक्षा तांत्रिक पायाभूत सुविधा उभारणाऱया कंपन्यांचे महत्त्व वाढत आहे. या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक मोठी आहे आणि स्पर्धाही तीव्र आहे. भारतीय आयटी कंपन्यांनी या बदलत्या पेंद्रबिंदूची दखल घेतली नाही, तर त्यांचे स्थान दुय्यम ठरू शकते.

तथापि, या सर्व प्रक्रियेत एक सकारात्मक बाजूही आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सर्जनशीलतेचा पर्याय नाही, ती तिचा विस्तार आहे. एआय कोड लिहू शकते, परंतु कोणती समस्या सोडवायची, कोणत्या व्यावसायिकसंदर्भात उपाय रचायचा आणि त्या उपायाची नैतिक व सामाजिक परिणामकारकता काय असेल, हे ठरविण्यासाठी मानवी विवेक आवश्यक आहे. म्हणूनच आयटी क्षेत्राने स्वतला ‘सेवा पुरवठादार’ या चौकटीतून बाहेर काढून ‘उपाय शोधणारे’ म्हणजेच सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून विकसित करणे गरजेचे आहे.

शिक्षण व्यवस्थेलाही या बदलाची जाणीव व्हावी लागेल. पाठांतर, साचेबद्ध प्रोग्रामिंग आणि निश्चित पद्धती यावर आधारित शिक्षण पद्धती आता पुरेशा राहणार नाहीत. तर्कशुद्ध विचार, समस्या विश्लेषण, बहुविध कौशल्ये आणि सतत शिकण्याची तयारी ही गुणवैशिष्ट्ये अधिक महत्त्वाची ठरतील. कृत्रिम बुद्धिमत्ता एखादे उत्तर देऊ शकते, पण योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता मानवी मनातच विकसित करावी लागते.

शेवटी प्रश्न असा उरतो की, सॉफ्टवेअर आणि आयटी सेवांचे अस्तित्व खरोखर धोक्यात आहे का? उत्तर संदिग्ध आहे. जुने मॉडेल, जुन्या सवयी आणि केवळ मनुष्यबळावर आधारित वाढत्या चौकटीत अडकलेले उद्योग निश्चितच आव्हानांना सामोरे जातील, परंतु जे या परिवर्तनाला स्वीकारतील, तांत्रिक गुंतवणूक वाढवतील आणि स्वतची भूमिका नव्याने परिभाषित करतील त्यांच्यासाठी संधीचे दार उघडे आहे. प्रत्येक तांत्रिक क्रांती काही व्यवसायांना मागे टाकते, तर काहींना नवे नेतृत्व देते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आयटी उद्योगासाठी मृत्युघंटा नाही, ती स्पर्धेची कसोटी आहे. हा काळ सजगतेचा आहे. बदल अनिवार्य आहे. प्रश्न इतकाच की, आपण त्या बदलाचे नेतृत्व करणार की त्याच्या मागे धावत राहणार? आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रासाठी ही निवड निर्णायक आहे. भविष्यातील यश केवळ किती कोड लिहिला यावर नव्हे, तर किती परिणामकारक मूल्य निर्माण केले यावर ठरेल. ज्यांना हे वास्तव चटकन चाणवेल तेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपले स्थान टिकवू शकतील.

(लेखक संगणक प्रणाली तज्ञ आहे)