
>> साधना गोरे [email protected]
आधीच्या ‘जेन-एक्स’, ‘जेन-वाय’, ‘जेन-झी’ असो, नाहीतर आताची ‘जेन-अल्फा.’ मराठी घरात जन्माला आलेल्या या सगळ्या पिढय़ांनी त्यांच्या लहानपणी एक गोष्ट हमखास ऐकलेली असते ती म्हणजे कावळा-चिमणीची गोष्ट. त्यातलं ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ किंवा ‘थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालू दे’ हे पालुपद कधीही ऐकलं की, प्रत्येकाला आपलं बालपण आठवतं. ‘इसापनीती’त ससा आणि चिमणी, भुंगा आणि चिमणी, पोपट आणि चिमणी, कोळी आणि चिमणी अशा कथा आहेत. चिमणी या पक्ष्यावर अनेक बालगीतं रचली गेलेली आहेत. त्यातली काही लोकगीतं, अंगाई गीतं आहेत.
चिमणी हा पक्षी तसा जगभर आढळतो, पण तो दाट जंगलात फारसा आढळत नाही. मानवी वस्तीच्या आजूबाजूला त्याचा अधिक वावर असतो. त्याच्या ‘चिव् चिव्’ आवाजावरून चिवणी-चिमणी नाव पडल्याचं म्हटलं जातं. उत्तर भारतीय भाषांमध्ये त्याची चिडि, चिडी, चिडिया अशी रूपं आहेत. कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते, चिमणी हा शब्द मूळ कोल भाषेतील आहे. मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोल या आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ही जमाती प्राचीन जमातींपैकी एक मानली जाते.
सर्व पक्ष्यांमध्ये चिमणी हा पक्षी आकाराने फार लहान असतो. त्यावरून चिमण किंवा चिमणा म्हणजे लहान हा अर्थ रूढ झाला असावा. ‘चिमणसाळ’ ही तांदळाची एक जात आहे. त्याच्या लहान आकारावरून त्याला हे नाव पडलं असावं. लहान मुलांच्या खाऊला ‘चिमणचारा’ म्हटलं जाई, तर लहान बागेला चिमनबाग. चिमुकले, चिमणसे हे शब्दही लहान याच अर्थाचे आहेत. जगदीश खेबुडकरांचं ‘बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला’ हे आजही लोकप्रिय असलेलं गीत आहे. या गीताच्या पुढील ओळी आहेत – ‘चिमनी मैना चिमना रावा, चिमन्या अंगणी चिमना चांदवा, चिमनी जोडी चिमनी गोडी, चोच लाविते चिमन्या चाऱयाला, चिमनं चिमनं घरटं बांदलं चिमन्या मैनेला’ या गाण्यात ‘चिमनी’, ‘चिमना’, ‘चिमन्या’ या शब्दांनी निर्माण केलेल्या अनुप्रासामुळे एक अनवट लय निर्माण झाली आहे. हे सगळे शब्द लहान या अर्थाचेच आहेत.
‘पालख पाळणा मोत्यांचा खेळणा, जोजवीते बाई माझा लाडका चिमणा’ या अंगाई गीतातील चिमणा शब्दही आई आपल्या तान्हुल्या बाळाला उद्देशून म्हणते आहे. मूल बोलायला शिकतं तेव्हा अडखळत बोलतं. लहान मुलांच्या या बोलण्याला ‘चिमखडे बोल’ असा समर्पक शब्द आहे. यावरून आठवलं लहान असताना एखादा पदार्थ वाटून घ्यायचा असला म्हणजे तो चिमणीच्या दाताने म्हणजे वस्त्रात गुंडाळून पह्डला जाई व मग वाटून खाल्ला जाई. यावरून दिसतं की, पक्ष्यांनी फळ चोचीने टोचलं तरी ते खराब होत नाही, ही समजूत बरीच जुनी असावी.
‘चिमणीसारखे तोंड करणे’ असा एक वाक्प्रचार आहे. सबंध चिमणी केवढीशी, त्यात तिचं तोंड आणखी इवलं! यावरून बारीक तोंड करणं, निराशा, दुःख, अपमान इ. मुळे चेहरा उतरला की, ‘चिमणीसारखं तोंड करून बसला आहे’ असं म्हटलं जातं.
मराठीत चिमणी हा शब्द आणखी एका अर्थाने वापरला जातो, तो म्हणजे गिरणीचं किंवा कारखान्याचं धुराडं. ग्रामीण भागात वीज नव्हती तेव्हा किंवा अगदी आता आतापर्यंत वीज गेल्यावर रॉकेलचे दिवे लावले जात. काचेच्या बाटलीत किंवा टिनच्या डब्यात रॉकेल भरून, त्यात सुतळीची वात घालून झाकणातून वर काढली जाई. रॉकेलमुळे हा दिवा एकसारखा धूर बाहेर फेकतो. घरातली जी दिवळ वरच्या बाजूला काळीभोर झालेली असे, ती दिवा ठेवायची दिवळ आहे हे न सांगता कळत असे. धूर फेकण्याच्या साधर्म्यामुळे गिरणीच्या धुराडय़ाला वापरला जाणारा हा शब्द लोक घरातल्या दिव्यालाही वापरू लागले.
पण दिव्यासाठी किंवा धुराडय़ासाठी वापरला जाणारा हा शब्द मराठी नाही. तो इंग्रजी chimney (चिम्नी) आहे. ग्रीकमधील kaminos, लॅटिनमधील caminus / caminata या शब्दांचे स्वरूप बदलून फ्रेंचमध्ये cheminee, पोर्तुगीज chamine असे झाले. या युरोपीय भाषांमध्ये हा शब्द इमारतीच्या छपरातून वाफ किंवा धूर सोडण्यासाठीचे नळकांडे, धुराडे या अर्थाने वापरला जाई. मराठीत या उच्चाराचा शब्द पक्ष्यासाठी वापरला जात असल्यामुळे तो परिचयाचा होता. मग मराठी वळणाचाच उच्चार धुराडय़ासाठी आणि धूर सोडतो म्हणून रॉकेलच्या दिव्यासाठीही वापरला जाऊ लागला. इतर भारतीय भाषांतही रॉकेलच्या दिव्याला चिमनी, सिमनी असे मिळतेजुळते उच्चार आहेत.






























































