
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला गेल्या चार वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा आहे. प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंहाची जोडी मिळावी यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहिले आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातील सिंहाची जोडी मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे.
मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय हे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असून दररोज मोठय़ा संख्येने पर्यटक आणि विद्यार्थी येथे भेट देतात. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील जैवविविधता वाढवण्यासाठी तसेच पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी आशियाई सिंह उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे महापौर रितू तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. जुनागढच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आशियाई सिंह मिळावे यासाठी गुजरात सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. गुजरातकडून सिंह मिळाल्यास त्या बदल्यात प्राणी किंवा पक्षी द्यावा लागणार आहे. पेंग्विनसह काही पक्ष्यांची यादीही सादर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या कोणते प्राणी….
प्राणिसंग्रहालयात सध्या शक्ती-करिश्मा ही वाघाची जोडी आहे. पेंग्विन हे प्रमुख आकर्षण आहे. वाघ, अस्वल, हरणे, अजगर, हत्ती, तरस, माकडे आणि शेकडो प्रकारचे पक्षी असे 13 जातींचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत. याशिवाय 283 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.




























































