
मुंबई महापालिकेच्या 17 पैकी 6 प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक तीन ठिकाणी बिनविरोध निवडून आले. तसेच उर्वरित तीन प्रभाग समित्यांमध्ये, शिंदे गटाचा एक ठिकाणी तर काँग्रेस पक्षाने दोन समिती अध्यक्षपदांवर विजय मिळवला. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.
एफ/उत्तर व एफ/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना पक्षाला समिती अध्यक्षपद मिळणे निश्चित असताना, ऐनवेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने शिवसेनेच्या उमेदवार नगरसेविका श्रद्धा जाधव यांचा शिंदे गटाच्या उमेदवार मानसी सातमकर यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी व्हिप काढलेला असतानाही काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आयशा सूफियान वणू या गैरहजर राहिल्या. तसेच समाजवादी पक्षाची भाजपला साथ मिळणार नसताना त्या पक्षाच्या इरम सिद्दिकी या गैरहजर राहिल्याने शिंदे गटाच्या उमेदवार मानसी सातमकर यांना भाजपची 5 आणि शिंदे गटाची -3 अशी 8 मते मिळाली, तर शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांना 6 मते, मनसेचे -1 अशी 7 मते मिळाली. दरम्यान, उर्वरित पाच प्रभाग समितींच्या निवडणुकीत, भाजपचे तीन नगरसेवक उमेदवार हे बिनविरोध निवडले आले, तर काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
प्रकाश दरेकर, आकाश पुरोहित यांची बिनविरोध निवड
पालिकेच्या ‘आर/मध्य’ आणि ‘आर/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने एकही उमेदवार न दिल्याने सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवक प्रकाश यशवंत दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे, प्रभाग ‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आकाश राज पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली. तसेच आर/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या लीना देहरकर यांच्या विरोधातदेखील विरोधकांनी उमेदवार न दिल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिंदे गटाकडे एक तर काँग्रेस दोन प्रभाग समिती अध्यक्षपदांवर विजयी
‘पी/पूर्व’ आणि ‘पी/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार हैदरअली अस्लम शेख हे 10 मते मिळवून निवडून आले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित बाळकृष्ण रावराणे यांना 8 मते मिळाली. त्यामुळे हैदरअली अस्लम शेख यांची समिती अध्यक्षपदी निवड झाली.
तसेच ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानराज निकम यांनी 7 मते मिळविली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांना 5 मते मिळाल्याने अवघ्या दोन मतांनी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ज्ञानराज निकम यांचा विजय झाला. काँग्रेस पक्षाने दोन प्रभाग समित्यांवर विजय मिळवला.




























































